Home स्टोरी तिलारी प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी मलिदा मिळवून देणारा प्रकल्प! युवासेना

तिलारी प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी मलिदा मिळवून देणारा प्रकल्प! युवासेना

125

दोडामार्ग: तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प महाराष्ट्र आणि गोवा शासनासाठी पांढरा हत्ती तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी मलिदा मिळवून देणारा प्रकल्प आहे. त्यामुळे गरजनसलेली कामे सुचवायची, त्यातून करोडो रुपये कमवायचे असे दुष्टचक्र वर्षानुवर्षे तिलारीत सुरू आहे. त्यामुळे त्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबाजी देसाई, मणेरी विभागप्रमुख रामदास मेस्त्री यांनी केली. तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरिता दोडामार्गात भूमिगत कालवे ही नवीन संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे. प्रत्यक्षात या कामाची काहीही आवश्यकता नाही. नको तिथे अनाठायी निधी खर्ची घालणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा नाहक चुराडा होत आहे. त्यामुळे गरज नसलेली कामे व ती सुचविणारी अधिकारी यांच्याविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दोडामार्ग तिलारी रोडवरील कसई दोडामार्ग केळीचेटेंब, तसेच खालची घाटवाडी धनगरवाडी सासोली भटवाडी या ठिकाणी जलसंपदा विभागाकडून भूमिगत कालवे (बॉक्स वेल)तसेच त्यांच्याशी निगडित अन्य कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मोठमोठी यंत्रसामुग्री, असंख्य कामगार, आदींच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांची ती कामे वेगात सुरू आहे. त्या तिन्ही ठिकाणच्या कामांची नेमकी आवश्यकता काय? गरज नसताना तसेच कोणाचीही मागणी नसताना केवळ स्वतःच्या आर्थिक स्वार्थाकरिता तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनीच ती कामे जन्माला घातली आहेत. कोट्यवधी रुपयांचा मलिदा त्या कामांच्या माध्यमातून मिळणार असल्याने त्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून सुरू केली आहेत. ज्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली गेली पाहिजे होती तेथे केवळ स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी आणि ठेकेदारांचे लाड पुरविण्यासाठी ती कामे त्या दोन अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोपही श्री देसाई यांनी केला आहे.