शिरोडा प्रतिनिधी (दिनेश मयेकर): तिरोडा व आजगांव ( सिंधुदुर्ग जिल्हा ) परिसरात विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे तिरोडा, आजगांव, नाणोस, गुळदुळे, धाकोरे, आजगांव – भोमवाडी, शिरोडा, आरवली, टांक, रेडी व पंचक्रोशी गावामध्ये शेतीची नांगरणी व पेरणीची कामे सुरु झाली आहेत.
काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पंपाच्या पाण्याच्या साहाय्याने पाणीपुरवठा करून भात बियाण्याची पेरणी केली असून त्यामुळे महिनाभरामध्ये तरवा आल्यावर त्याची लावणी करणे सोपे जाणार आहे.
पूर्वीच्या पारंपरिक बियाण्यांना फाटा देऊन शेतकऱ्यांनी आपले संपूर्ण लक्ष आता अधिक उत्पन्न देणाऱ्या संकरित बियाण्यांकडे वळविले आहे.या बियाण्यांमध्ये प्रामुख्याने शुभांगी, मसूरी, कर्जत, पार्वती, कोमल, गोरखनाथ, जया, क्रांती व आदी संकरित बियाण्यांची खरेदी मोठ – मोठया प्रमाणे खरेदी केली जात आहे.
पिकांचे अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खतांचाही वापर करू लागले आहेत. सध्या पॉवर टिलरच्या साहाय्याने शेताची नांगरणी सुरु झालीत आहे. पॉवर टिलरच्या एका तासाच्या नांगरणीसाठी 700 ते 800 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गोष्ट बनली आहे.