Home Uncategorized तवसर मी आसयच तुझी वाट बघीत!

तवसर मी आसयच तुझी वाट बघीत!

192

मसुरे प्रतिनिधी: 

 

गणेशोत्सवात कोकणातली घरा माणसांनी भरान व्हावतत. दहा दिवसांचो सण सरलो की मात्र ती घरा सुनी सुनी होतत. घर सांभाळणारी कोणाची आवस- बापुस, आजी- आजोबा मात्र पुढच्या गणपतीची वाट बघित रव्हतत! कारण पुढच्या गणपतीक परत तेंचि मटी माणसांनी पुन्हा भरून जावची असता. गणेशोत्सवाचे दहा दिवस संपल्यावर कोकणातील एका वयोवृद्ध आजीच्या मनात उठलेले काहूर देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रणय देवदत्त पुजारे या उच्च शिक्षित युवकाने शब्दबद्ध केले हत. ते तेच्याच शब्दात…….

 

काय रे बाबा, पोचलस काय तुझ्या आवशी-बापाशीकडे?… ता काय तुका ईचारुक नको, तू तर देवच आसस…

१० दिवसासाठी इलस आणि सगळा घर भरून टाकलस. कोणाचो झील इलो, कोणाचा चेडू इला, कोणाचो भाव इलो तर कोणाचो घोव इलो. कामाधंद्यासाठी लांब लांब गेलेली माणसा सगळी तुझ्यासाठी आपल्या घराक इली. माझीव पोरा नातवंडांसकट इली आणि सगळा गोकुळ कसा भरान गेला. हेर सुनासुना वाटणारा घर अगदी आनंदान हसाक लागला, मग तुझे आरते, तुझी भजना सगळा अगदी चालूच होता.

मी पण हेचीच वाट बघीत असतय रे…

तुझ्या निमतान माझा घर बोलाक लागता, सगळी लेकराबाळा येतत, १० दिवसाची गजबज… तुका सांगू? लय बरा वाटता रे… नायतर बाकी वर्षभर कोण कोणाक नसता, प्रत्येकाच्या घरात दोनच माणसा… ते पण आमच्यासारखे म्हातारे आवस-बापुस. कोणाचा काय झाला तरी जाग गावाची नाय अशी तऱ्हा. पण तू येतस आणि त्या १० दिवसात सुनसान घराक अगदी जीव येता रे, माझ्यासारख्या म्हातारेच्या आंगारव मूठभर मास चढता, पोरांच्या संगतीन २ घास माझेव अधिक जातत…

गंमत बघ ना कशी हा, तू तुझ्या आवशी-बापाशीक सोडून आमच्या घरात येतस तेव्हा आमची पोरा पण घराक येतत, पण तू धा दिवसानी तुझ्या आवशी-बापाशीकडे जातस तेव्हा आमची पोरा पण आमका सोडून लांब जातत रे… तेंची तरी काय चूक म्हणा, बापडी जीव म्हणाक कशीतरी ८ दिवस रजा घेवन येतत. टीचभर पोटासाठीच चलला सगळा, असो!!!

पण तू तुझे धा दिवस पुरे करून तुझ्या घराक गेलस आणि माझा घर पण खाली झाला. सगळी पोराटोरा आपापल्या कामानी आपल्या आपल्या दिशेक गेली. तुझ्यासाठी लावलेला मकार आता माळ्यावर गेला, पताके लावलेले आता कचऱ्यात जावन पडले, छत ताणलेला आता पेटयेत बंद झाला…

आणि मी? मी बापडा बसलय आता हुंबऱ्यार, माझ्या मुंबैक गेलेल्या पोरांचो फोन येयत तेची वाट बघीत…

आता फुडच्या वर्षी तू परत येयपर्यंत असाच बसाक होया, माका तरी बाकी काय होया रे, माझी सगळी माणसा खुशाल ऱ्हवांदे आणि तुझ्या निमतान तरी वर्षातना एकदा एकटय होवंदे… पण तू मात्र लवकर ये हा…तवसर मी आसयच तुझी वाट बघीत, जीवात जीव असापर्यंत, हयच दारात बसान……..!