अमरावती: तलाठी भरती परीक्षेच्या तिसऱ्या सत्रामध्ये कॉपी करणाऱ्याला एकाला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन जप्त करण्यात आलं आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रात आत सोडण्याआधी तपासणी केली जाते, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराकडे वरील सामुग्री सापडल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ड्रीमलॅन्ड मार्केट या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून नांदगाव पेठ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपक चवरे (बीड) असं अटक करण्यात आलेल्या उमेदवाराचं नाव असून त्याची चौकशी सुरू आहे.
खरंतर परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासून या संपूर्ण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची चर्चा जास्त झाली. कधी कॉपीची कीड, तर कधी सर्व्हर डाऊनमुळे आतापर्यंत अनेक अडचणी आल्या. आता पुन्हा यामध्ये हायटेक कॉपीची सामुग्री सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
या आधीही नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीची घटना घडली असून त्या प्रकरणी गणेश गुसिंगे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा पिंपरी – चिंचवड पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आणि म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे तो फरार होता. यावर कहर म्हणजे वैद्यकीय भरती प्रक्रियेच्या एका परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही आरोपीचे नाव आले आहे. त्यामुळे या आरोपीचा किती पेपर फुटींमध्ये समावेश आहे, यामागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे याची चौकशी केली जात आहे.