सिंधुदुर्ग प्रतिनिधी: डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सुरूवातीपासूनच पूर्वग्रहदूषितपणा ठेऊन एकांगी आणि राजकीय विचारांनी केला गेला. अध्यात्माचा प्रसार आणि सामाजिक कार्य करणार्या सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला. ‘दाभोळकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. या प्रकरणात सनातनच्या 700 हून अधिक साधकांच्या पोलीस चौकशा केल्या; मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. तपासाला प्रारंभ होण्यापूर्वीच ‘आरोपी कोण’ हे प्रथम निश्चित करण्यात आले आणि त्या दृष्टीने तपास करून खोटे-नाटे पुरावे गोळा करण्यात आले. त्यात पुढे दोनवेळा आरोपी आणि साक्षीदार बदलण्यात आले. त्यामुळे दाभोळकर हत्येचा तपास हा पूर्णपणे भरकटलेला असून त्याला दाभोळकर कुटुंबीय आणि तत्कालीन नेतेच जबाबदार आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने ‘तथाकथित विवेकवादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’ या विषयावर आयोजित विशेष संवादात ते बोलत होते.
या वेळी श्री. राजहंस पुढे म्हणाले की, लोकांना डॉ. दाभोलकर यांचा ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट’ माहिती आहे; पण त्यांचा ‘परिवर्तन’ नावाचाही ट्रस्ट आहे, ज्यात त्यांच्या परिवारातील बहुतांश सदस्य ट्रस्टवर आहेत. हा ट्रस्ट खर्या अर्थाने त्यांचा ‘परिवार’ ट्रस्ट आहे. ही माहिती समाजात उघड झालेली नाही. काश्मिरला भारताचा भाग न दाखवणार्या ‘स्वीस एड फाउंडेशन’ या विदेशी संघटनेकडून या ‘परिवर्तन ट्रस्ट’ला सेंद्रिय शेतीच्या नावाखाली कोट्यवधीच्या देणग्या येत होत्या. सेंद्रिय शेतीचा आणि दाभोळकरांचा काडीमात्रही संबंध नव्हता. तसेच वृत्तपत्र चालवणार्या संस्थेला विदेशांतून देणग्या घेता येत नाहीत, असा कायदा असूनही ते विदेशी देणग्या घेत होते. या संदर्भात तक्रारी केल्यावर डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टचा ‘एफ.सी.आर्.ए.’ परवाना सरकारने रद्द केला. तसेच आधीच्या अंनिस ट्रस्टमध्येही अनेक खोटे व्यवहार झाले होते. त्यामुळे त्यावर प्रशासक नेमण्याची शिफारस धर्मादाय कार्यालयाने केली होती. या सर्व प्रकारामुळे अंनिस ट्रस्टवर असणार्या अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची बदनामी झाली होती. जर डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली नसती तर, आज ते तुरुंगात असते; कारण दाभोलकर यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे आमच्याकडे भक्कम पुरावे होते, मात्र त्या वेळी दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. या आर्थिक घोटाळ्यांतून वा त्यांच्या संघटनेचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातूनही त्यांची हत्या झालेली असू शकते, या दिशेने तपास का करण्यात आला नाही ? असा प्रश्नही श्री. राजहंस यांनी उपस्थित केला.
जिहादी आतंकवादाचे चित्र सर्वत्र दिसत असतांना कुठे तरी अल्पसंख्यांकांची मतपेटी वाचावी, यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने वर्ष 2006 नंतर ‘भगव्या आतंकवादा’चे चित्र निर्माण केले. प्रथम मालेगावमध्ये हिंदूंना गोवण्यात आले. ‘गांधी हत्येनंतर या देशात केवळ दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याच हत्या झाल्या आणि त्या हिंदुत्ववाद्यांनीच केल्या’ असा प्रचार अजूनही चालू आहे. हा प्रचार आणि चर्चा सुरू ठेवत जिहादी आणि साम्यवादी यांनी देशभर केलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या हत्यांविषयी पांघरुण घालायचे, असे एक षड्यंत्र देशात सुरू आहे. त्यात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू आहे, असेही श्री. चेतन राजहंस चर्चासत्राच्या अंती म्हणाले.