पाकला गोपीनीय माहिती दिल्याचे प्रकरण.
१२ ऑगस्ट वार्ता: डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या भ्रमणभाषमधील काही अॅप्स काढून टाकल्याचा अहवाल पुणे फॉरेन्सिक प्रयोगशाळेने दिला आहे. कुरुलकर यांनी आणखी कोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे का ? याचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाला (ए.टी.एस्.) करायचे आहे. यासाठी कुरुलकरांचा भ्रमणभाष गुजरात येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये पुढील अन्वेषणासाठी पाठवण्याची अनुमती ए.टी.एस्.ने न्यायालयात मागितली आहे. कुरुलकर यांनी भ्रमणभाषमधील व्हॉट्सअॅप संभाषण पुसून (डिलीट) टाकले होते. आतंकवादविरोधी पथकाने हे संभाषण पुणे फॉरेन्सिक प्रयोगशाळेतून प्राप्त करून त्या आधारे कुरुलकर यांच्यावर दोषारोपपत्र नोंद केले आहे; मात्र भ्रमणभाषमधील अॅप्स उघडण्यात अपयश आल्याने ते गुजरातला पाठवण्याची मागणी ए.टी.एस्.ने केली आहे. डॉ. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयात नमूद केले होते. कुरुलकर यांनी ब्राह्मोसच्या संदर्भात कोणती गोपनीय माहिती दिली आहे का ? हे पहाणे आवश्यक असल्याचे ए.टी.एस्.ने म्हटले आहे.