Home क्राईम डेगवे येथील शासकीय वनात खैराची चोरतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन...

डेगवे येथील शासकीय वनात खैराची चोरतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई..!

128

डेगवे ग्रामस्थांनी वनसंरक्षणासाठी दिलेल्या कौतुकास्पद सहकार्यासाठी सावंतवाडी वन विभागाने मानले आभार….!

 तोड करणारे दोन्ही आरोपी मौजे-तळवडे, ता.सावंतवाडी येथील.

 

 

 सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक-४८ ४५ मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री १२ वाजता, डेगवे ग्रामस्थांचा मदतीने वन विभागाने रंगेहात ताब्यात घेतले.

याचा सविस्तर वृत्तांत असा की, डेगवे तांबोळी रत्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून, खैर झाडाची कटरच्या सहाय्याने तोड करून त्याची वाहतूक करण्याचा तयारीत असल्याचा सुगावा डेगवे येथे राहणाऱ्या श्री.शंकर देसाई या तरुणाला लागताच त्यांनी तात्काळ इतर गावकरी मंडळी व वन विभाग यांना याबाबत माहिती दिली. सावंतवाडी वन परिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. उपस्थित ग्रामस्थ व वनअधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले.

सदरच्या आरोपींची नावे ही, १) महेश मोहन मालवणकर (वय-२९ वर्षे, रा.तळवडे- म्हाळाईवाडी, ता.सावंतवाडी) तसेच, २) दौलत अशोक गोडकर (वय-२० वर्षे, रा.तळवडे, ता.सावंतवाडी) अशी आहेत. आरोपींनी सोबत आणलेल्या कटर मशीन, बॅटरी, तोड केलेल्या खैर झाडाचा माल तसेच सोबत आणलेली दोनचाकी गाडी (MH-07-AN-3337) देखील ताब्यात घेण्यात आली. सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

डेगवे ग्रामस्थ यांनी आपले गावचे शासकीय जंगल संरक्षित करून टिकवून ठेवण्यामध्ये, वन विभागाला वेळोवेळी सहकार्य करून, मोलचा वाटा उचललेला आहे. दरवेळी प्रमाणे या कारवाईमध्ये देखील जंगल संरक्षणासाठी डेगवे ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेबद्दल तसेच गावातील जंगलात चोरतोड कारणाऱ्या आरोपींना पकडून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलल्या बद्दल सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी उपस्थित डेगवे ग्रामस्थ, पदाधिकारी यांचे आभार मानले. तसेच वन विभागाला वेळेत बातमी देऊन सहकार्य करणाऱ्या श्री.शंकर देसाई या तरुणाचा वन विभागाकडून बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डेगवे गावचे सरपंच श्री.राजन देसाई, माजी सरपंच श्री.मधुकर देसाई, पोलिस पाटील श्री.अरविंद देसाई, ग्रा.सदस्य श्री. राजेश देसाई,बातमी देणारे श्री.शंकर देसाई व इतर ग्रामस्थ मंडळी घटनास्थळी उपस्थित होते. यासोबतच या कारवाई मध्ये पर्यावरणप्रेमी असलेली युनियन बँक-शिरोडा शाखेचे बँक व्यवस्थापक श्री. अजिंक्य घोडके यांनी देखील वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.

सदरची कारवाई ही, मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद सावंत, पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक-संतोष मोरे, दत्तात्रय शिंदे, अप्पासो राठोड, सागर भोजने, संग्राम पाटील व डेगवे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पार पाडली.