प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने वेधले शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष….
मसुरे प्रतिनिधी:
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शाळांना पुरविण्यात आलेल्या निकृष्ट धान्यादि मालाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 या कालावधीचा धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु पुरवण्यात आलेला हिरवा वाटाणा व तुरडाळ निकृष्ट दर्जाची आहे. वाटाणा शिजत नसून चवही कडवट लागते, याबाबतच्या तक्रारी मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात शाळा स्तरावरून करण्यात आलेल्या आहेत.
तसेच वाहनचालकांकडे वजन काटा नसल्याने तसेच शाळास्तरावरी ते उपलब्ध नसल्याने सदर धान्यादि माल मोजमाप न करता वाहनचालक आहे तसा ताब्यात घेण्याची सक्ती शाळा मुख्याध्यापकांना करतात व तपासणी न करताच त्याची पोच देण्याची घाईही वाहनचालक करतात. पोषण आहार शिजवून देणे बंधनकारक असल्यामुळे मिळालेला माल आहे तसा मुख्याध्यापकांना नाईलाजाने ताब्यात घ्यावा लागतो. त्यामुळे मुख्याध्यापकांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास होतो.
तरी निकृष्ट धान्य प्राप्त झालेल्या शाळांकडून सदरचे धान्य ताब्यात घेऊन त्या ऐवजी उत्तम प्रतीचे धान्य पुरविण्यात यावे तसेच सर्व वाहनचालकाकडे वजन काटे ठेवण्याच्या सक्त सूचना आपल्या स्तरावरून संबंधित ठेकेदाराला देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, सिंधुदुर्ग च्यावतीने अध्यक्ष संतोष पाताडे यांनी केली आहे.