ठाणे: येथील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर बेदम आक्रमण होत असल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि अभियांत्रिकी या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तरित्या एन्.सी.सी.चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाच्या वेळी विद्यार्थ्यांना सैन्य (आर्मी) आणि नौदल (नेव्ही) यांच्या प्रशिक्षणाच्या पूर्वीचे धडे देण्यात येतात; परंतु येथे विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रीकरणात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रांगणात साचलेल्या पाण्यात हात आणि पाय टेकवून आडवे करण्यात आले आहे. वरिष्ठ विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. हा वरिष्ठ विद्यार्थी त्यांना लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करतांना दिसत आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की, विद्यार्थी अक्षरश: कळवळतांना दिसत आहेत. महाविद्यालयातील एका जागरूक विद्यार्थ्याने भ्रमणभाषमध्ये हे चित्रीकरण केले आहे. या वरिष्ठ विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे, की कनिष्ठ विद्यार्थी त्यांना घाबरून करियर उद़्ध्वस्त होईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे. अशा शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एन्.सी.सी.विषयी भीती पसरली असून अनेक विद्यार्थी ‘एन्.सी.सी. नकोच’ असेच म्हणत आहेत.महाविद्यालयाने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून ‘असा कोणताही प्रकार आम्ही खपवून घेणार नसल्या’चे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
