कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. अशा शुल्लक कारणावरून जर मारहाण होत असेल, तर ती या पर्यटन जिल्ह्याची बदनामी आहे. तसेच असे कृत्य पुन्हा घडू नये आणि कायद्याचा धाक राहावा यासाठी या ईसमाचा स्टॉल बंद करण्यात यावा. यापुढे अशा प्रकारची घटना घडल्यास हिंदू समाज शांत बसणार नाही असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन शुक्रवारी सायंकाळी देण्यात आला. यावेळी आपल्या मागणीचे निवेदनही पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
झाराप येथे पर्यटकाला चहा बदलून देण्याच्या विषयावरून माराहाण झाली होती. या घटनेनंतर पोलीसांनी संबंधितांची तक्रार नसताना स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत सहा जणांवर गुन्हे दाखल केले होते. या घटनेचे पडसाद कुडाळात शुक्रवारी उमटले. यानंतर सायंकाळी सकल हिंदू समाज एकवटत कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. यावेळी आपल्या मागणीचे निवेदनही पोलीस प्रशासनाला दिले. यावेळी चर्चा करताना सांगितले की, शुल्लक कारणावरून पुणे येथील पर्यटकांना झाराप झिरो पॉईंट येथील हॉटेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. अशा शुल्लक कारणावरून जर मारहाण होत असेल, तर ती जिल्ह्याची बदनामी आहे. त्यामुळे या घटनेकडे पोलीस प्रशासनाने गांभीयनि बघावे. मारहाण करणारे सर्व व्यक्ती या मुस्लिम समाजातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत धार्मिक सलोखा अबाधित राहिला आहे. परंतु अशा व्यक्तीमुळे पुढे जाऊन धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा मुजोर लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. असे कृत्य पुन्हा घडू नये आणि कायद्याचा धाक राहावा म्हणून संबंधित स्टॉल, हॉटेल बंद करण्यात यावे,जर संबंधित लोकांवर कारवाई झाली नाही व पुन्हा अशी घटना घडल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही. असा इशारा पोलीस प्रशासनाला देत प्रशासनाकडून सदर घटनेसंदर्भात योग्य ती कडक कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्या भागात काही चुकीचे होत असल्यास कारवाई करावी.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पोलीस प्रशासनाची भूमिका मांडताना सांगितले की, जिल्ह्याची पर्यटन या ओळखीला बाधा पोहचू नये. यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकारात बांधणे, काठीने मारहाण करणे, एकत्र येऊन माराहाण करणे अशी सर्व प्रकारची कलमे लावली आहेत. यात पोलिसांनी यात कोणतीही कुचराई केली नाही. पर्यटन व्यवस्था व व्यवसायाला बाधू पोहचू नये. ते स्टॉल बाबत आपण योग्य तो अहवाल पाठवू. तो स्टॉल अनधिकृत असेल तर आपण योग्य ती कारवाई करू. जेवढे कायदेशीर होईल तेवढे करू असे सांगितले.
यावेळी विवेक पंडीत, शेखर नाडकर्णी, रमाकांत नाईक, धीरज परब, समीर सराफदार, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, दिनेश सावंत, हेमंत जाधव, सुधीर राऊळ, प्रसन्ना गंगवणे,बाळा पावसकर, रत्नाकर जोशी, चंदन कांबळी, शुभम देसाई, अरविंद करलकर, अमित सरनोबत व हिंदू बा़ंधव उपस्थित होते.