Home क्राईम झाराप येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे ५ संशयित आरोपी २४ तासात जेरबंद..!...

झाराप येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे ५ संशयित आरोपी २४ तासात जेरबंद..! सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई.

138

कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील झाराप येथील बैंक ऑफ इंडीया चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला गेला असून यामध्ये किरण बाळु चव्हाण वय-29 वर्षे, रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे 2) विजय दिनानाथ जाधव वय 19 वर्षे, रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे 3) मारुती गोविंद सुरवसे वय-19 वर्षे, सध्या रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. कोराळ ता. उमरगा, जि. उस्मानाबाद 4) समाधान शहाजी यादव वय-27 वर्षे, रा. बाबुळगाव ता. इंदापुर, जि. पुणे 5) औदुंबर राजकुमार शेलार वय-27 वर्षे, रा. पळसदेव ता. इंदापुर जि. पुणे या संशयितांचा समावेश आहे. या पाचही जणांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

यातील किरण बाळु चव्हाण याचे अंगझडतीमध्ये एसबीआय बँकेची 12 एटीम कार्ड, एचडीएफसी बँकेची 03 एटीएम कार्ड, कर्नाटका बँकेची 02 एटीम कार्ड, युनियन बँकेची 02 एटीएम कार्ड, कॅनरा बँकेची 03 एटीम कार्ड तसेच बैंक ऑफ महाराष्ट्र, बैंक ऑफ इंडीया, आयडीबीआय बँक, एक्सीस बँक, कोटक बैंक यांची प्रत्येकी 01 एटीएम असे एकुण 27 एटीएम कार्ड, 02 मोबाईल आढळून आले. समाधान शहाजी यादव याचे अंगझडतीत 01 मोबाईल व औदुंबर राजकुमार शेलार याचे अंगझडतीत 01 मोबाईल आढळून आला असून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच गुन्हयात वापरलेली इंटींगा कार क्रमांक एम एच 12 एक्स क्यू 2697, 01 पल्सर मोटार सायकल (रजीस्ट्रेशन नंबर नाही), एक ऑक्सीजन गैस सिलेंडर, एक LPG सिलेंडर व गॅस कटर असे जप्त करण्यात आले आहेत.

 

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी रात्री बँक ऑफ इंडिया चे झाराप येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. दरम्यान याबाबत नवी मुंबई येथील एटीएम सेंट्रल कंट्रोल युनिट ला या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे लक्षात आले होते. त्यानुषंगाने त्यांनी कुडाळ पोलीसांना याबाबतची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे कुडाळ पोलिस या ठिकाणी पोहोचले होते.

पोलिसांना त्याठिकाणी एटीएम रुममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला सफेद रंगाची चिकटपट्टी व हॅण्डग्लोज चिकटलेला दिसुन आला होता व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर काढून टाकण्यात आल्याची बाब निदर्शनास आली होतीप. तसेच एटीएम च्या बाजुला एक ऑक्सीजन गैस सिलेंडर, एक एलपीजी सिलेंडर व गॅस कटर असे साहित्य मिळून आले होते. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ०२ व्यक्तींच्या संशयीत हालचाली दिसुन आल्या होत्या. याप्रकरणी बँकेचे अधिकारी गुरुप्रीत परमजीत सिंह यांनी बैंक ऑफ इंडीया शाखा झाराप चे ATM फोडण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली होती.

त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५, ६२, ३ (५) प्रमाणे दोन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाच्या पाहणीनंतर तसेच मिळालेल्या साहित्याच्या आधारे करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणात संशयित आरोपी हे इंदापुर जि. पुणे येथील असल्याचे उघड झाले होते. कुडाळ पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील व पोलीस हवालदार हरेश पाटील , सुबोध मळगावकर यांनी पुणे – इंदापुर येथे जात संशयित आरोपीना त्यांचे राहत्या घरातून ताब्यात घेत सिंधुदुर्गात आणण्यात यश आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून पाचही संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या जलद आणि यशस्वी कारवाई बाबत त्यांनी अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहायक पोलीस निरक्षक वैशाली आडकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप पाटील, उपनिरीक्षक प्रविण धडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव, हवालदार अमोल बंडगर, संजय कदम,योगेश वेंगुर्लेकर, समीर बांदेकर, हरेश पाटील, पोलिस नाईक रुपेश गुरव, गणेश चव्हाण, महेश भोई,सुबोध मळगावकर, सुप्रिया भागवत या कुडाळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी – कर्मचारी यांचे तसेच आवश्यक तांत्रीक मदत करणाऱ्या सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग व त्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांचे अभिनंदन केले आहे.