मसुरे प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस – ओरोस येथील कृषीकन्यांच्या पुढाकाराने झाराप येथील केंद्र शाळा क्र. १ येथे रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य प्राध्यापक भेंडे सर, प्राध्यापक गोपाळ गायकी, प्राध्यापिका भावना पाताडे, प्राध्यापक महेश परुळेकर व प्राध्यापक प्रसाद ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या प्रेरणेतून प्रतीक्षा पाटील, साक्षी ठाकूर, अनस्वरा के. उदय, रिफाना फातिमा आणि शिवरंजिनी आर. या कृषीकन्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व प्रभावी संचालन केले.

कार्यक्रमात टाकळा, आळूची पानं, कडवीचिंच, करडई, माठ यांसारख्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले. त्याच रानभाज्यांचा वापर करून विविध चविष्ट व पौष्टिक पारंपरिक पदार्थांची पाककला स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमात केंद्र शाळा क्र. १ चे श्री शिरोडकर सर, अमोल तेली, सरपंच सौ. दक्षता मेस्त्री, तसेच कृषी सहाय्यक सौ. जागृती शेट्ये उपस्थित होते. ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत रानभाज्यांविषयी माहिती घेतली व कृषीकन्यांचे कौतुक केले. रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी उपयोग व स्थानिक अन्नसंस्कृती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.







