सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात किंजवडे ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील नव्याने विवाह केलेल्या व्यक्तींनी विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या जागेमध्ये दोन नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढावे. अशी नियमावली ग्रामपंचायतीने काढली आहे. त्यानंतरच विवाह नोंदीचा दाखला देण्यात येणार आहे, असा उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला आहे. सर्वस्तरावरून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. किंजवडे गावचे सरपंच संतोष किजवडेकर आणि ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी किजवडे गावचा पदभार स्वीकारल्यानंतर गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्मार्ट ग्राम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. राज्य स्तरावर प्रथम येण्यासाठी ते नवनवीन उपक्रम गावामध्ये राबवत आहेत. शासनाच्या विविध अभियानामध्ये सहभाग घेत आहे. आपल्या घरांच्या अंगणामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोन वृक्षांची लागवड करावयाची आहे. तसेच जर आपल्याकडे जास्त जमीन असेल तर दोन पेक्षा जास्त झाडे लावावी.
ही झाडे नवीन विवाह केलेल्या व्यक्तीने लावल्यानंतर ग्रामपंचायत दिवसभरात विवाह नोंदणीचा दाखला उपलब्ध करून देते. त्यामुळे ही औपचारिकता राहता नये. प्रत्यक्षात झाडे लागवड करून पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे. या हेतूने ग्रामपंचायतीने एक वेगळा उपक्रम राबविला आहे. त्या वृक्षांसोबत फोटो काढून उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विवाह नोंदणी दाखला मिळवण्यासाठी ग्रामसेवक शिवराज राठोड आणि गावातील ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे किंजवडे गावचे सर्वत्र पातळीवर कौतुक केले जात आहे.