सावंतवाडी: ज्ञानदीप मंडळाने सातत्याने गुणवंतांचा केलेला सत्कार हा त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, ज्ञानदीपचे कार्य हे राज्यातील इतर अनेक संस्थांना आदर्श व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी येथे केले. सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे कळसुलकर प्रशालेचे कलाशिक्षक एस. व्ही. पेडणेकर यांचा सेवानिवृत्तनिमित्त तर कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक डी. जी. वरक सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा ज्ञानदीपच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा कळसुलकर हायस्कूलमध्ये संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक एन. पी. मानकर, प्रदीप सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी श्री. पेडणेकर व श्री. वरक यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. पेडणेकर यांनी ज्ञानदीप मंडळाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक एस. आर. मांगल्ये, शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय सदस्य शिवाजी सागडे, कोकण विभाग कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्राध्यापक रुपेश पाटील, श्री. पेडणेकर ,श्री. वरक आदी उपस्थित होते.
दरम्यान सत्काराला उत्तर देताना श्री. पेडणेकर व वरक यांनी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे विशेष आभार मानले व यापुढेही ज्ञानदीप मंडळाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस. पी. कुळकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष वैभव केंकरे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक अनिल ठाकूर यांनी केले तर एस. व्ही. भुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.