जळगावच्या पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची महासभा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आजही त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं. अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठीचा आकडा जमवू शकतात, असं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मोठं भाकीत केलं.
पुष्पचक्र अर्पण करा
प्रत्येकजण आपआपली गणितं मांडत असतात. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. सध्याचे मुख्यमंत्री आणि ४० लोकांचे राज्य आहे. ते पुढच्या १५ ते २० दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं. फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकाल उशिरा लागतोय. हे सरकार टिकत नाही. या सरकारचा मृत्यू लेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही कधी आणि कुणी करायची हेच बाकी आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. फिनिश. पुष्पचक्र अर्पण करा, असं संजय राऊत म्हणाले.
पक्षातून गेलेल्यांना परत घेणार का?
शिवसेनेशी गद्दारी करून जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं सांगितलं. आम्ही पक्षातून गेलेल्यांना परत घेणार नाही. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. पक्षाच्या विचाराशी गद्दारी केली आहे, असं संजय राऊत म्हणाले. जो गये, वो भगवान को प्यारे हो गये, असंही ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना आता ठाकरे गटात येण्याचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे.