सिंधुदुर्गनगरी: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांच्यासाठी २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्हा सोलापूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याला जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरीतून प्रारंभ झाला असून अधिकारी कर्मचाऱ्यासह ४५ सदस्य सोलापूरकडे रवाना झाले आहेत.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत दरवर्षी जिल्ह्यातील सरपंच, जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अकलूज, बार्शी, सोलापूर सिटी असा २०ते २३ नोव्हेंबर या कालावधीसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात विविध ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, कृषी केंद्रे अशा ठिकाणी भेटी देणार आहेत.
या अभ्यास दौऱ्यात समन्वयक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर ,सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी पी.आर.फाले, ग्राम विकास अधिकारी नारायण मांजरेकर, आपले सेवा सरकार जिल्हा समन्वयक परेश परब, लेखापाल श्रीमती कविता मेंस्त्री यांच्यासह विविध गावचे सरपंच असे मिळून एकूण ४५ सदस्यांची टीम या दौऱ्यात सहभागी झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरी येथून दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, कर्मचारी उवस्थित होते.