मसुरे प्रतिनिधी: शाळेतील मुलांना शेतीविषयक माहिती मिळावी,श्रम करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी केंद्रशाळा मसुरे नं.१ची मुले आणि शिक्षक यांनी पालकांसमवेत बांधावरची शाळा हा उपक्रम मसुरे येथे राबविला.
शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते. आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.
शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो. याच गोष्टीचा विचार करून आपल्या महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक दृष्ट्या शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या जीवन ,शेतीची अवजारे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. श्री.दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं.१ या प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवृंदाने अनुभवला. बांधावरच्या शाळेतील एक दिवस या उपक्रमांतर्गत शेतीची लागवड कशी करावी, तरवा काढणी-लावणी, शेती अवजारांबद्दल माहिती, शेती विषयक असणाऱ्या अनेक गोष्टींची चर्चा प्रत्यक्ष बांधावर जाऊन विद्यार्थ्यांनी शेतमालकाशी केली. पारंपारिक शेतीतील अनेक अवजारे, आधुनिक शेतीची नवीन पद्धत, अवजारे याबाबत अनेक शंका विचारल्या गेल्या. त्यावेळी शा.व्य.स.अध्यक्ष सौ.शितल शैलेश मसुरकर,उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, श्री.सन्मेष मसुरेकर,केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख,शेतमालक सौ.सविता दिलीप मोरे तसेच प्रशाला उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत ,शिक्षक गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर,सुजाता वेडेकर,हेमलता दुखंडे आदिजण उपस्थित होते. दिवसभर या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी शेती विषयीचा अनुभव घेत माहिती घेतली. प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान घेण्यात आले. हा अनुभव ज्या शेतकरी मालकांमुळे मिळाला त्या सविता दिलीप मोरे त्यांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले.