Home स्टोरी जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या दुसऱ्या विहिरीचे काम ही निकृष्ट! तुळस गावातील प्रकार:...

जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या दुसऱ्या विहिरीचे काम ही निकृष्ट! तुळस गावातील प्रकार: ग्रामस्थांची कारवाईची मागणी

186

वेंगुर्ला प्रतिनिधी: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावात जलजीवन मिशन अंतर्गत शासनाकडून लाखो रुपये खर्च करून बांधलेली दुसरी पाण्याची विहीर कोसळण्याच्या स्थितीत आहे. तरी प्रशासनाने तात्काळ याची पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी शासनाकडून जल जीवन मिशन योजना राबविली जात आहे. त्यातूनच तुळस गावात एकूण अशा तीन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी तुळस खरीवाडी आणि तुळस पलतड या दोन ठिकाणी या पाण्याच्या विहिरी मंजूर झाल्या आणि बांधकाम करण्यात आले. यापैकी पहिली खरीवाडी येथील विहीर बांधकाम करतानाच तेथे काम निकृष्ट झाल्याने तेथील शासकीय निधीचा दुरुपयोग झाला. ते निकृष्ट बांधकाम चर्चेत असताना तुळस पलतड येथे बांधलेली या योजनेतील दुसरी विहीर ही कोसळण्याच्या स्थितीत आहे.

पावसामध्ये विहिरीचे बांधकाम बऱ्याच ठिकाणी तुटल्याने या कामातही दर्जेदार साहित्य वापरले नाही आणि दर्जेदार काम झाले नाही हे दिसत आहे.शासनाकडून अशा एका विहिरीसाठी ४० ते ५० लाख रुपये निधी खर्च केला जातो. या निधीचा ठेकेदारांच्या चुकीच्या कामामुळे असा जर दुरुपयोग होऊन निधी पाण्यात जात असेल तर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. तिसरी विहीर मंजूर आहे परंतु त्याचे अद्याप काम सुरू झाले नाही. दरम्यान या निकृष्ट कामाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तुळस येथील ग्रामस्थांकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनीही या विहिरीची ग्रामस्थांसमवेत पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.