योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभधर्म । भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे।। तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त। गुजेविण हित कोण सांगे ।। ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगति तरणोपाय ।।
अभंगाचा भावार्थ:- योग याग, विधी या साधनांनी अध्यात्मिक सिध्दी प्राप्त होत नाही. उलट विनाकारण उपाधी आणि दंभ मात्र पदरात पडतात. भावाशिवाय देव आकळत नाही, हे निःसंशय त्याचप्रमाणे गुरुकृपेशिवाय आत्मानुभव कसा प्राप्त होईल? तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही. त्याचप्रमाणे आपले गुह्य किंवा निजगुज दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल ? ज्ञानदेव सांगतात की, वर दिलेल्या दृष्टांतात ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरे संभवत नाही त्याप्रमाणे साधूच्या संगतीशिवाय साधकाला तरणोपाय नाही.
जय जय राम कृष्ण हरी!