Home क्राईम जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबार प्रकरण अपडेट्स.

जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबार प्रकरण अपडेट्स.

214

३ ऑगस्ट वार्ता: जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला असून गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला. पालघर नजीकच्या घटनेमुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे प्रवासात चेतन सिंह नावाच्या आरसीएफ जवानाने प्रवाशांवर गोळीबार केला. यात चार जण जागीच ठार झाले, रजा नाकारल्यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले असे म्हटले जात आहे. त्याची मानसिक स्थिती ही चांगली नव्हती, असं म्हटले जाते. त्याने पालघर स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढलेल्या आपल्या वरिष्ठ कर्मचारी आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचली असता ट्रेन मीरा रोड स्थानकाजवळ थांबली. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शस्त्रांसह अटक करण्यात आली. आरोपी चेतन सिंहची चौकशी सुरू आहे. मात्र गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही. उलट चौकशीदरम्यान नारेबाजी करत आहे.

पालघरमधील नालासोपाऱ्याचा अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (४८) आणि बिहारच्या मधुबनी येथील असगर अब्बास शेख (४८) अशी दोन मृत प्रवाशांची रेल्वे पोलिसांनी ओळख पटवली आहे. अजुनही एकाची ओळख पटलेली नाही.आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनला सात दिवसांच्या सरकारी रेल्वे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पण तो चौकशीत सहकार्य करत नाही. तसेच गोळीबाराशी संबंधित प्रश्न विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देतो. इतकेच नव्हे तर त्याने घोषणाबाजीही केली. या आरोपीला १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलीसांनी केली. मात्र, न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.