सावंतवाडी प्रतिनिधी: व्यापारी गाळे काढण्यासाठी मालकाने चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. याविषयीं कारीवडे ग्रामपंचायतीने पंचयादी घालून गाळे मालकाला गटार काढण्याच्या सूचनाही दिल्या. तहसिलदार तसेच गटविकास अधिकारी यांनीही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मात्र याविषयीं गेले वर्षभर कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे संबंधित गाळे मालकासह ग्रामपंचायतने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर मंगळवारी दि. १५ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांसह उपोषण छेडण्याचा इशारा दत्ताराम विष्णू गावडे यांनी दिला आहे.
याबाबत दत्ताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारानुसार, कारीवडे पेडवेवाडी येथील धर्माजी गावडे यांनी व्यापारी गाळ्यांसाठी चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत १७/१/२०२२ रोजी कारीवडे ग्रामपंचायतीकडे अर्ज त्यानंतर ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि पोलीस पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी धर्माजी गावडे यांनी गटार काढून देतो असे सांगितले. परंतु काहीच केले नाही. त्यानंतर गेल्या वर्षी पावसाळ्यातघराच्या बाजूला पाणी साचल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी यांनी पाहणी केली. त्यावेळीही धर्माजी गावडे यांनी पाणी कमी झाले की गटार काढतो मात्र गटार काढला नाही. तसेच सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी आपल्या दि. १० ऑगस्ट रोजी बैठक घेऊन ग्रामपंचायत अधिनियम १९५७ कलम ५३ प्रमाणे संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश कारीवडे ग्रामपंचायतीला दिले.
मात्र याबाबत संबंधितासह कारीवडे ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या दोघांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी आई आणि अपंग भावासह उपोषण छेडण्याचा इशारा दत्ताराम विष्णू गावडे यांनी दिला आहे.