Home स्टोरी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम दिली जाणार नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम दिली जाणार नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

124

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, या प्रकरणी संबंधित उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार पर्यवेक्षण झाले नसेल, तर कार्यवाही केली जाईल. या सर्व कामांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात येईल आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम अदा केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

आमदार भास्कर जाधव यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, कळवंडे धरणामध्ये सध्या २२ टक्के इतका पाणीसाठा आहे. वर्ष २०१९ पासून धरणाच्या दोन्ही बाजूस माती भरावामधून पाणी पाझरत असल्याने गळती प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्याविषयी विहित प्रक्रिया राबवण्यात आली. या कामाचे अंदाजपत्रक दीड कोटी रुपयांच्या आतील असल्याने अशा टेंडरसाठी कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जात नाही; मात्र जलसंपदा विभागाची कामे करतांना कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जावी, या अनुषंगाने स्वतंत्र शासननिर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासननिर्णयात पालट करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल.