Home क्राईम चोरलेले दागिने ठेवले रेल्वेच्या पडक्या वसाहतीमध्ये माठेवाडा चोरी प्रकरणातील सर्वच मुद्देमाल...

चोरलेले दागिने ठेवले रेल्वेच्या पडक्या वसाहतीमध्ये माठेवाडा चोरी प्रकरणातील सर्वच मुद्देमाल हस्तगत करण्यात यश…! संशयिताला न्यायालयीन कोठडी 

179

कुडाळ:  कुडाळ माठेवाडा येथील बालाजी गोरख घाडगे यांच्या घरातील चोरी प्रकरणातील दागिने अक्षय म्हाडेश्वर याने कुडाळ एमआयडीसी भागातील रेल्वेच्या पडक्या वसाहतीमध्ये लपवून ठेवले होते. या वसाहतीमधील एका पाईप मध्ये ठेवलेले हे दागिने संशयीतांने दाखविल्यानंतर पोलीसांनी ते हस्तगत केले. दरम्यान या चोरी प्रकरणातील रोख रक्कम व दागिने असा १ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले असून याप्रकरणी अक्षय याला कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कुडाळ माठेवाडा येथील बालाजी गोरख घाडगे रा. माठेवाडा यांच्या घरात ही चोरीची घटना घडली होती. २६ जुन रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वा. या कालावधीत ही घटना घडली होती. यावेळी संशयिताने घराची कौले काढून आतमध्ये प्रवेश केला व घरातील दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. यात ४.५ ग्रॅम चे मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे तीन कानातील जोड, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, सोन्याचा मुहुर्तमणी व २५ हजार रोख रक्कम असा १ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता.याप्रकरणी अक्षय म्हाडेश्वर याला कुडाळ पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. यानंतर त्याच्याकडून चोरलेले दागिने व रोख रक्कम याबाबत पोलिसांनी कसून तपास केला. यावेळी संशयिताने हे चोरलेले दागिने रेल्वेच्या कुडाळ एमआयडीसी भागातील पडक्या वसाहतीमध्ये लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी अक्षय सह कुडाळ एमआयडीसी येथील त्या वसाहती परिसरात जात दागिने ताब्यात घेतले. यावेळी हे दागिने संशयिताने एका पाईप मध्ये सुरक्षितपणे लपवून ठेवले होते. ही चोरीची घटना पाच महिन्यांपूर्वी घडली होती. यानंतर त्याने रेल्वेच्या भग्न वसाहती परिसरात ठेवलेले दागिने आजही सुरक्षित होते. रेल्वेच्या या सर्वच वसाहती मोडलेल्या असून त्याठिकाणी कोणीच जात नाही. या वसाहती झाडी झुडपांनी वेढलेल्या आहेत. याचाच फायदा घेत अक्षय याने चोरलेले दागिने लपविण्यासाठी ही जागा निवडली असावी. यानंतर पोलिसांनी हे दागिने जप्त केले. यातील चोरीला गेलेली रोख रक्कम यापूर्वीच्याच गुन्ह्यात पोलीसांनी हस्तगत केली आहे. त्यामुळे या चोरीतील सर्वच मुद्देमाल पोलीसाच्या हाती लागला आहे. या प्रकरणी अक्षय याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत. अक्षय म्हाडेश्वर याने चोरलेले दागिने वस्तू स्वतः कडे कधीच ठेवल्या नाहीत. कधी बॅंकेत कधी मित्रांकडे तर कधी दागिने ठेवण्यासाठी विना वर्दळीचा रेल्वे वसाहतींचा भागाची निवड केली. त्यामुळे चोरी विषयावर तो अतिशय कुशाग्र डोक्याचा असल्याचे दिसून येत आहे.