राज्यातली कायदा व सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय. आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरून एका व्हिडिओ वरून SIT स्थापन होते. एका चुंबन प्रकरणावरून SIT स्थापन होते. तर माग बार्शीतील गरीब मुलीचं जे रक्त सांडलं गेलं, तिच्यावर कोयत्याने निर्घृणपणे हल्ला झाला, त्यावरून काहीच कारवाई होत नाही. त्यावर बोललं तर माझ्यावर, एका खासदारावर, पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. ही राज्याची शोकांतिका असल्याची गंभीर टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना केली. बार्शी येथील अल्पवयीन मुलीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले छायाचित्र ट्विट केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावरून राऊत यांनी गृहमंत्री आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांना होणारा विरोध तसेच राज्यातील शिवसेना पक्षाविरोधातील कारवायांवरून संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना कुणाला तरी विकायची आहे, म्हणून मोठा सौदा केला जातो. निवडणूक आयोगाचा वापर केला जातो. एका फुटलेल्या गटाच्या हातात शिवसेना दिली जाते. हेसुद्धा इतिहासात घडलं नव्हतं. देशातली लोकशाही संपतेय म्हणून असं वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची संसदेतील मेंबरशिपच रद्द करावी, अशी मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती.