Home स्टोरी चालती बोलती केंद्रे निर्माण करा: गुरुमाऊली श्रीआण्णासाहेब मोरे

चालती बोलती केंद्रे निर्माण करा: गुरुमाऊली श्रीआण्णासाहेब मोरे

74

नाशिक (प्रतिनिधी): ग्राम अभियानाच्या माध्यमातून गावागावात माती-विटांची केंद्रे निर्माण करण्यापेक्षा घराघरात दोन पायांची चालती बोलती केंद्रे निर्माण करा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्रीआण्णासाहेब मोरे यांनी केले.

श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथील श्री गुरुपीठामध्ये गुरुमाऊलींचा साप्ताहिक सत्संग पार पडला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपल्या अमृततुल्य हितगुजात मार्गदर्शन केले. गुरुमाऊली म्हणाले की, आज देशात नागरी समस्या तसेच कौटुंबिक समस्या आणि वैयक्तिक समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की, लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे सेवेकऱ्यानी परिवार,समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी घराघरांमध्ये दोन पायांची चालती बोलती केंद्रे म्हणजेच सक्रिय सेवेकरी घडवावेत. मूल्यसंस्कार विषयावर बोलताना ते म्हणाले की, राम- कृष्ण, छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराजांसारखी सुसंस्कृत, कर्तुत्ववान, सदाचारी पिढी निर्माण होण्यासाठी मूल्यसंस्कार विभाग सक्षम करणे काळाची गरज आहे. तर विवाह संस्कार विभागावर बोलताना त्यांनी प्रत्येक सेवाकेंद्रात विवाह मंडळे निर्माण व्हावीत आणि गावागावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक विवाहांना चालना देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. देशभरामध्ये सध्या पावसाने ओढ दिली असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणी करण्याचे संकट निर्माण झाले आहे.त्याकरिता पाण्याचा अनावश्यक वापर थांबवून जलसंपत्ती जपावी असे विचार त्यांनी मांडले. पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावीत व झाडांचे संगोपन करावे असे सांगताना ते म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वखर्चातून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वटवृक्षाची झाडे लावली,विहिरी खोदल्या, धर्मशाळा उभारल्या हा जीवनादर्श अंगीकारून सेवेकर्‍यांनी सेवाकार्य करावे असे त्यांनी नमूद केले. कुटुंबाच्या भल्यासाठी खर्चीक पूजा टाळायच्या असतील तर रोज पंचमहायज्ञ करावा आणि नवीन सेवेकऱ्यांनी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायांचे वाचन करावे असे त्यांनी स्पष्ट केले.सेवामार्गाने माती आणि गोमयापासून गणेशमूर्ती तयार केल्या असून त्यामध्ये आयुर्वेदिक वृक्षांच्या तीन बिया आहेत. त्यामुळे सेवेकर्‍यांनी गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्याऐवजी गणेशमूर्तीचे खड्ड्यात रोपण करावे ,जेणेकरून कालांतराने आयुर्वेदिक वृक्षांचा जन्म होईल तसेच गणेशोत्सव काळात मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र व प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण करून घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.आज मोबाईल आणि टीव्हीच्या जमान्यात गावागावातील ग्रंथालये ओस पडली असून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सेवेकर्‍यांनी नव्या जुन्या ग्रंथांचे वाचन करावे आणि त्यातील अमूल्य ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे . भाद्रपद महिन्यात श्री दत्त महाराजांचे पूर्ण अवतार श्रीपाद श्रीवल्लभ जयंती व अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान नारायणाचा उत्सव सेवामार्गातर्फे साजरा केला जातो. या दिवशी सामुदायिक श्रीसत्यनारायण पूजा होते,बाळकृष्णाच्या मूर्तीवर १००८ तुळशीपत्रे अर्पण केली जातात व विष्णू नामावलीचे वाचन केले जाते. पितृ पंधरवड्यात महालय श्राद्ध तिथीनुसार केले जावे तसेच वाढदिवसही इंग्रजी तारखेप्रमाणे न करता तिथीनुसार केला जावा असे ते म्हणाले.

श्री गुरुपीठात नवनाथ पारायण

श्री गुरुपीठामध्ये ८,९ आणि १० सप्टेंबर रोजी तीन दिवसीय श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे सामुदायिक पारायण होत असून ज्यांना शक्य आहे त्यांनी या उपक्रमात अवश्य सहभागी व्हावे तसेच ८ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यातील विश्रामगड येथे दुर्ग अभियान,वृक्ष लागवड आणि सप्तशतीचा सामुदायिक पाठ घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.