२९ मे वार्ता: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकृत माहितीनुसार चांद्रयान -२ च्या अपयशानंतर चांद्रयान-३ ची घोषणा झाल्यानंतर आता हे चंद्रयान प्रक्षेपण करणाच्या तयारीत आहे. १२ जुलै रोजी चांद्रयान-३ चे प्रक्षेपण होणार आहे. हे यान २३ ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार आहे. इस्रोने २०१९ मध्ये चांद्रयान २ प्रक्षेपित केले होते. अंतराळ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल स्पेस एजन्सीच्या बंगळुरूस्थित मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत संदर्भात माहिती दिली आहे.
‘चांद्रयान-३’ मोहीम ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी GSLV Mark ३ या प्रक्षेपकाद्वारे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवले जाणार आहे.लँडर आणि रोव्हरवरील या वैज्ञानिक उपकरणांची व्याप्ती ‘सायन्स ऑफ द मून‘ या ‘थीम’वर काम करेल. आणखी एक प्रायोगिक साधन चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या “स्पेक्ट्रोपोलरीमेट्रिक” चा अभ्यास करणार आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. इतकेच नाही तर चांद्रयान ३ ची स्पर्धा रशियन वाहन लुना २५ शी देखील होणार आहे.
चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. तर चांद्रयान ३मध्ये तिसऱ्या टप्प्यात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल असतील. सध्या चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. यासंबंधीच्या सर्व चाचण्या मार्चमध्येच झाल्या आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे, भूकंपाच्या हालचाली वर लक्ष ठेवणे अशा अनेक गोष्टी अभ्यासल्या जाणार आहेत.