Home स्टोरी चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल!

चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल!

133

मसुरे प्रतिनिधी:

 

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील कोजागिरी पौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अखेर घटस्थापना व देवीची प्रतिष्ठापना, आराधना, पारायण या धार्मिक विधी वटवृक्ष मंदिरात ज्योतिबा मंडपात प्रतिवर्षी होत असतात. विजयादशमीनंतर वटवृक्ष मंदिराच्या ज्योतिबा मंडपात कोजागिरी पौर्णिमेला प्रती वर्षाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा साजरी होणार होती, परंतु यंदा कोजागरी पौर्णिमेस खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दिनांक २८ ऑक्टोबर शनिवार रोजी पौर्णिमेस वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल करण्यात आल्याची माहिती पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभुमीवर वटवृक्ष मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी ७ वाजता संपन्न होणारी देवीजींची इंद्रपुजा व दुधप्रसाद वाटपही इत्यादी धार्मिक कार्यक्रमही होणार नाहीत. शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनीटांनी चंद्रग्रहणाचे वेध सुरू होतील. त्यामुळे शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ची शेजारती व रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ ची काकड आरती होणार नाही. तसेच स्वामी भक्तांचे अभिषेकही होणार नाहीत. ग्रहणमोक्षानंतर मंदीर स्वच्छता करून रविवारी सकाळी ११:३० ची नैवेद्य आरती नेहमीप्रमाणे संपन्न होवून पुढील दीनक्रम नेहमीप्रमाणे होतील.

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होत असून सायंकाळ, रात्र व मध्यरात्री सह, दिनांक २८ ऑक्टोबरचीच रात्रीसह दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दिवस उजेडायच्या आगोदर म्हणजेच रात्री ०१:०५ ते रात्री २:२३ मिनिटांपर्यंत चंद्रग्रहणाचा पर्वकाळ आहे. या काळात चंद्रग्रहणाचे स्पर्श रात्री १ वाजून ५ मिनिटांनी, ग्रहणाचे मध्य रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी तर ग्रहणाचा मोक्ष रात्री २ वाजून २३ मिनिटाला असेल. या संपूर्ण चंद्रग्रहणाचा पर्वकाळ १ तास १८ मिनिटे असेल. चंद्रग्रहणचा हा पर्वकाळ साधारणतः मध्यरात्रीचा असल्याने दिनांक २८ ऑक्टोंबर व दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी सर्वसामान्य भाविकांना स्वामींचे दर्शन घेण्याकरिता काहीही हरकत नाही. त्यामुळे मंदिर नियमितपणे चालू राहील, परंतु या ग्रहण काळात आजारी मुले, मुली, वृद्ध, गर्भवती स्त्रीया यांनी ग्रहणाचे वेध संध्याकाळी ७ च्या पुढे पाळावेत असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांनी केले आहे.