Home स्टोरी घुबडांना का वाचवायचं? शेतकऱ्यांसाठी रमाकांत कुलकर्णी यांचा एक उपयोगी लेख

घुबडांना का वाचवायचं? शेतकऱ्यांसाठी रमाकांत कुलकर्णी यांचा एक उपयोगी लेख

98

घुबडांना का वाचवायचं? ओरिसामधील वाईल्डलाईफ सोसायटी ऑफ ओरिसा या संस्थेनं ढेंकनाल जिल्ह्यातील खजुरिया गावात अर्ध्या एकराच्या शेतात एक प्रयोग केला .त्यांनी वीस बांबू उभारून घुबडांना बसता येईल अशा वीस बैठका (मांड किंवा अडू म्हणजे पर्च) तयार केल्या. एक महिन्यानंतर त्यांनी या अर्ध्या एकरातील उंदरांची बिळे खोदून पाहिली त्यांना एकही उंदीर सापडला नाही. यावरून त्यांची कामगिरी लक्षात येते. घुबडे ही उत्कृष्ट जैविक नियंत्रक (Biological Controler) म्हणून चोख भूमिका बजावतात. मुळात घुबडांना संरक्षण देऊन त्यासाठी शेताच्या कडेला अशा प्रकारे बैठका तयार करण्याची कल्पना इंडोनेशिया या देशात पहिल्यांदा जन्माला आली.अशा प्रकारचे प्रयोग या देशात कमालीचे यशस्वी झालेले आहेत.या प्रयोगांच्या मागील महत्त्वाचं तत्त्व म्हणजे आपल्या शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. दरवर्षी एकट्या ओरिसा राज्यात ८० लाख टन धान्य केवळ उंदरांमुळे नष्ट होतं. इतर कोणत्याही मार्गाने विशेषत: उंदरांची औषधं वगैरे वापरून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर गोची होते.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

उंदरांची औषधं परिणामकारक तर नसतातच शिवाय ती पर्यावरणस्नेही देखील नसतात. या औषधांमुळे पाणी आणि माती प्रदूषित होते. या औषधांचा विषार कृषीपरिसंस्थेत प्रवेश करतो आणि अन्नसाखळी बिघडवतो त्यामुळे निसर्गातील काही उपयुक्त जीवांचा हकनाक बळी जातो. कोणत्याही जातीच्या घुबडाची एक जोडी जर पाच पिलांना जन्म देत असेल तर ही पाच पिल्ले एका वर्षात सुमारे तीन हजार उंदीर खाऊन कृषीपरिसंस्थेचं आरोग्य राखतात आणि पर्यायी शेतकऱ्यांना मदत करतात. पूर्ण वाढलेल्या एका शृंगी घुबडाला त्याच्या वजनाच्या सुमारे १० टक्के एवढ्या अन्नाची गरज असते. हे घुबड प्रामुख्याने वेगवेगळ्या जातींच्या उंदरांवर आणि कृदंत (तीक्ष्ण दंती) वर्गातल्या प्राण्यांवर गुजारण करतो. एक प्रौढ शृंगी घुबड दिवसाला साधारण दोन किंवा तीन उंदीर मारून खातं. एकटं गव्हाणी घुबड (Barn Owl) एका वर्षात सुमारे १५०० उंदीर आणि चिचुंद्री सारखे प्राणी खातं.

संग्रहित फोटो

गव्हाणी घुबडाचं एक कुटुंब एका रात्रीत कृदंत वर्गातले सुमारे पंचवीस प्राणी संपवतं. इतर घुबडजातींशी तुलना करता या घुबडाला सर्वात जास्त पिल्लं होतात. विणीच्या एका खेपेला चार ते दहा अंडी घातली जातात. अशा प्रकारे हे घुबड एका वर्षात तीन वेळा अंडी घालतं.महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा इंडोनेशिया आणि ओरिसा या ठिकाणी केलेल्या प्रयोगांचं अनुकरण केले पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी शिवारांमधल्या , गावरायांमधल्या,कुरणांमधल्या आणि गायरायांमधल्या नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वड, पिंपळ, आंबा,उंबर, मोह, पिंपरण, नांद्रुक, चिंच, कवठ आणि बेल अशा खास आपल्या झाडांना अक्षरश: हात देखील लावायचा नाही.अगदी वठलेली पण जागेवर उभी असलेली झाडं सुद्धा तशीच ठेवायची. ती पडतील तेव्हा पडतील. त्यातल्या त्यात जुन्या पुराण्या ढोल्या असणाऱ्या झाडांना तर वडीलधार्‍या माणसांचा मान द्यायला हवा. कारण अशा झाडांमध्ये घुबडांची आसरे असतात आसरे टिकले तरच घुबडं वाचतील.-

वरील लेख प्रख्यात पक्षी निरीक्षक श्री.किरण पुरंदरे ह्यांच्या “दटा हंकाट” (गोंड भाषेतील शब्दांचा अर्थ = चला चालायला सुरुवात करु या ) ह्या पुस्तकातून उतरवला आहे.

हा संदेश कृपया सर्व शेतकरी पक्षीप्रेमी ह्यांच्या पर्यंत पोहचवा.

रमाकांत कुलकर्णी – 9730081941