Home स्टोरी गोविंदा..दहीहंडीचे शिलेदार ! अर्थातच, ही लेखणी गोविंदांसाठी .! 

गोविंदा..दहीहंडीचे शिलेदार ! अर्थातच, ही लेखणी गोविंदांसाठी .! 

179

सिंधुदुर्ग:

दहीहंडी म्हणजे ‘थिल्लरपणा’ नव्हे ! हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारताच्या मातीत रुजलेला-पोसलेला, अनेक वर्षांच्या पर्जन्यसरी-ऊनसावल्या झेलून समृदध झालेला हा नेत्रदीपक सोहळा आहे. या सोहळ्याला कालौघात खेळाचे स्वरुप प्राप्त होत गेले. वर्षातील फक्त एक दिवस थरांवर थर रचून मानवी मनोरे सांधण्यासाठी महानगरांपासून गावे, गल्ली-वाड्यापर्यंतचा तरुण वर्ग एकत्र जमू लागला. हिंदी-मराठी चित्रपटातील जुन्या-नव्या मराठी गाण्यांच्या तालावर, गोविंदाच्या जयघोषाने आजही संपूर्ण भारत कान्हामय होतो. अनेक अडथळे येऊनसुद्धा गोविंदा उंचावरच्या लक्षवेधी कलशातील तीर्थाने या धरतीला न्हाऊ घालतात. ज्याच्या आदर्शाने हा सोहळा होतो, अगदी त्या नटखट गोविंदासारखेच चिवट जणू ! मटकी फोडून शिक्यावरचे लोणी मटकावले म्हणून गोविंदाच्या काय कमी तक्रारी जात होत्या यशोदामातेकडे? पण म्हणून त्याने दही, दूध, लोणी सोडले काही नाही! श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी फार आवडायचे. हे पदार्थ कुठेही दिसले की ते संवंगड्यांना वाटून तो आपणही फस्त करीत असे. कृष्णाला दही सहज मिळू नये, यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवायची. पण श्रीकृष्ण सवंगड्यांच्या मदतीने तिथपर्यंत पोहचत असे. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. अगदी तस्सेच हे गोविंदा ! अनेक तक्रारी होऊनही यांनी हा दिवस साजरा करण्याचे सोडले नाही. याबाबतीत गोविंदांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायलाच हवी.

वर्षानुवर्षे चालत आलेली दहीहंडी अनेकवेळा नियमांच्या कचाट्यात अडकत असते. सरकारकडून अनेक नियम आजवर लागू करण्यात आले आहेत. अर्थात, दरवर्षी हंडी फोडण्याच्या प्रयत्नात जखमी होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असते, हे यामागील कारण असावे. यावर्षी या गोविंदांना सरकारने विमाकवच जाहीर केले. शासनाने या दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. समाधान व्यक्त करण्यासारखाच हा निर्णय आहे.

दहीहंडी का साजरी होते ?

अष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाची पूजा करायची. रात्री नामसंकीर्तन करायचे. दुसऱ्या दिवशी या दहीहंडी खेळायची. गोविंदासारखे उंचावर ठेवलेले दही मटकावून टाकायचे. गोविंदाच्या नावाचा जयघोष करायचा. कान्हाच्या लीलेची आठवण म्हणून साध्या-सोप्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

समाजात सुशिक्षितता वाढली तसे हे पारंपरिक भारतीय खेळ समाजाला नकोसे वाटू लागले. या खेळांमधील दोष दाखविले जाऊ लागले. रस्त्यावर दहीहंडी खेळल्याने वाहतुकीची कोंडी होते. गोविंदांचे अपघात होतात. प्राणहानी होते. त्यामुळे दहीहंडीवर टीका होत असते. प्रत्यक्ष दहीहंडी फोडतानाचे थरार आणि इतक्या वर्षांच्या दहीहंडीचा विचार करता खरोखरच ही टीका योग्य आहे का, असा विचार नकळत मनात येऊन जातो.

 

भारतीय दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी मुंबईसारख्या महानगरात विदेशी पर्यटक आवर्जून येतात. हे या खेळाचे महत्त्व आहे.

 

दहीहंडी आणि गोविंदा….

जारो वर्षे हा खेळ टिकून आहे. खेळाविषयी प्रचंड प्रेम मनामनात निर्माण केले आहे. याचे पूर्ण श्रेय हे फक्त गोविंदांनाच द्यावे लागले. तरुणांच्या अनेक पिढ्यांनी निरपेक्षपणे, नि:स्वार्थीपणे या खेळाला सकस केले आहे.

मूळचा हा खेळ भारतीय आहे. जीवन जगण्याचे पाठ जगाला देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या कृतीने पुढे खेळाचे स्वरुप धारण केले. या खेळात कोणाकडूनही उधारी-उसनवारीने किंवा विकतचे आणून मिसळलेले नाही. हा शुद्ध भारतीय खेळ भारतामध्येच उपेक्षित राहिला. तसेही अनेक भारतीय खेळ आज नाहीसेच झाले आहेत; पण दहीहंडी मात्र घट्ट पाय रोवून उभी आहे. लाखो गोविंदांचे या थरांमध्ये योगदान आहे. दिवसभर काम करुन संध्याकाळी तसेच सुट्टीच्या दिवशी सर्वजण एकत्र जमतात. कसून सराव करतात. या सरावासाठी कोणीही प्रशिक्षक नसतो; किंवा कोणतेही शक्तीवर्धक पेय नसते. या खेळामुळे कोणताही एक खेळाडू यशाच्या शिखरावर पोहोचत नाही. तर प्रत्येक गोविंदा आपल्या पथकाचे नाव मोठे करतो. या पथकात नवनवीन तरुण सहभागी होत जातात. दहीहंडीच्या स्पर्धा म्हंटल्यावर संघाची नावे डोळ्यासमोर येतात, संपूर्ण पथक डोळ्यासमोर येते. हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. गोविंदांना व्यक्तिगत स्तरावर कोणताही आर्थिक लाभ या खेळाने दिला नाही. प्रतिष्ठा दिली नाही. पण हजारोंच्या समुदायाला नेत्रसुख प्रदान करण्याचा आनंद या गोविंदांनी अनुभवला आहे. क्षणभर उपस्थितांच्या काळजाचे ठोके चुकवणारा, उंच मानवी मनोरा रचून ऐक्याचे सामर्थ्य दाखवून देणारा हा खेळ गोविंदांनी सर्वसामान्यांकडून गोळा केलेल्या देणगीवर जिवंत ठेवला आहे.

 

दहीहंडी हा साहसी खेळ आहे, हे समजायला हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला. हा खेळ म्हणजे सामूहिकतेचे उत्तम उदाहरण आहे. मिळालेले यश हे फक्त संघाचे असते. शारिरीक कौशल्य, चपळाई, ऊर्जा, उत्साह, वजन पेलून धरण्याची क्षमता, मानसिक कणखरता, आत्मविश्वास, अचूक नियोजन, सातत्याचा सराव या सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये असाव्या लागतात. मनाला वाटले म्हणून गोविंदाच्या पथकात सामील होता येत नाही. दहीहंडी खेळण्यासाठी गोविंदा कसून सराव करीत असतात. अपवाद वगळल्यास दिवसभर काम करणारी ही माणसे असतात. केवळ आवड म्हणून ते यात सहभागी होत असतात. वर्गणीसाठी येत असल्यानेही त्यांच्यावर टीका होते. परंतु दहीहंडीचे सराव, टीशर्टस तसेच अन्य गोष्टींसाठी होणारा खर्च भागवण्यासाठी त्यांना पैशांची गरज असते. राजकीय व्यक्ती तसेच संस्थांकडून आयोजित होणाऱ्या दहीहंडीमुळे काही ठिकाणी अलीकडे या खेळाला हातभार लागतो. भारतात होणाऱ्या पाश्चिमात्य खेळांच्या तुलनेत ती अगदी नगण्यच आहेत म्हणा !

पाश्चिमात्य खेळांवर भारतात कोट्यवधी रुपयांची बरसात होते. त्या खेळांकडे प्रतिष्ठा म्हणून पाहिले जाते, त्या खेळाडूंना मानसन्मान मिळतो. दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना असा सन्मान कधीही मिळाला नाही.

 

अस्वस्थ करणारे प्रश्न….

दहीहंडीबाबत वेळोवेळी नियम लावले गेले. परंतू ते लावत असताना आपण या खेळाकडे कधीतरी सहानुभूतीने पाहिले आहे का, याचा विचार केला गेला नाही. उघड्या रस्त्यावर दगडमातीवर उभे राहून हे तरुण मनोरे उभे करीत असतात. पाश्चिमात्य खेळांसारखे या गोविंदांसाठी मऊ-मखमलीचे ‘लॉन’ नसते. ते असायला हवे, असे कधीतरी या समाजाला वाटले आहे का ?

 

गोविंदा दहीहंडीसाठी देणगी का गोळा करतात, याचा कधी विचार होतो का? भारतात पाश्चिमात्य खेळांना सरकारकडून मिळणारे अर्थसहाय्य या दहीहंडीला कधी दिले जाते का ? सर्वांच्या देणगीने या खेळाला अप्रत्यक्षपणे सर्वांचा हातभार लागतो.

दहीहंडी हा प्राणघातक खेळ आहे, असा आक्षेप असतो. पण कोणता खेळ जीवघेणा नाही? फरक एवढाच आहे की अन्य खेळांबाबत हा धोका लक्षात घेऊन प्राणहानी होऊ नये याची तजवीज आधीच केलेली असते. खेळाडूंना संरक्षक साहित्य पुरविले जात असते. खेळाच्या ठिकाणी उत्तम व्यवस्था केलेली असते. गोविंदांना यापैकी काय मिळते ? पुरेशा सुविधांअभावी गोविंदांच्या प्राणावर बेतत असल्याने भारतीयास हळहळ वाटली पाहिजे. कोणत्याही संरक्षक साहित्याशिवाय दहीहंडी फोडणारे हे गोविंदा म्हणूनच कौतुकास पात्र आहेत.

दहीहंडीमुळे वाहतूक कोंडी होते, ही एक समाजाची समस्या आहे. ही चुकीची नाही; परंतु वर्षातील फक्त एक दिवस दहीहंडीचा खेळ या समस्येला कारणीभूत ठरतो. पण वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे प्रत्येक दिवशी रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असते. म्हणून आपण कोणी स्वत:चे वाहन खरेदी करणे थांबवतो का? आपल्या भारतीय खेळासाठी आपण एक दिवस देऊन बघूया.

 

हे समर्थन नाही !

भारतीय खेळाची पिछेहाट होऊ नये, एवढीच एक इच्छा आहे. या खेळाचा थरारच असा आहे, की नजीकच्या काळात तो विदेशातही लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही; कारण समाजमाध्यमे, तंत्रज्ञान यामुळे जग आता अगदी जवळ आले आहे. भारत युवा वर्गाचा देश आहे. युवावस्था म्हणजे सळसळत्या रक्ताचे आणि प्रचंड महत्वाकांक्षेचे एक वय आहे. सगळे तरुण नि:स्वार्थ बुद्धीने एकत्र येत असतील तर त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात. या खेळासाठी गोविदांना संरक्षक साहित्य पुरविले गेले पाहिजे.

अनेक गोविंदांचे संघ आहेत, जे सामाजिक उपक्रम राबवीत असतात. अपवाद तर प्रत्येक गोष्टीलाच असतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मुली आणि महिलासुद्धा दहीहंडी खेळू लागल्या आहेत.

असो, तर हा दहीहंडी खेळ प्रतिकूल परिस्थितीतही जतन करुन ठेवल्याबद्दल प्रत्येक गोविंदास सलाम !!

लेखकसौ. मंगल नाईक-जोशी: सावंतवाडी….