Home स्टोरी गोवा विद्यापिठात कर्मचारी भरती घोटाळा झाल्याचा संशय!

गोवा विद्यापिठात कर्मचारी भरती घोटाळा झाल्याचा संशय!

152

८ ऑगस्ट वार्ता: गोवा विद्यापिठात भरती घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ (‘आर्.जी.’चे) पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांना मिळालेल्या उत्तरावरून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गोवा सरकारने नोकर भरतीसाठी ‘भरती आयोग’ही स्थापन केलेला आहे; मात्र गोवा विद्यापिठात नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आहे कि नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.गोवा विद्यापिठाने कंत्राटी पद्धतीवर कनिष्ठ कारकुनाची नेमणूक करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी एक विज्ञापन प्रसारित केले होते. या पदासाठी सुमारे अडीच सहस्र उमेदवारांनी अर्ज केले. पदासाठी ५ मार्च या दिवशी परीक्षा घेण्यात आली आणि गोवा विद्यापिठाच्या संकेतस्थळावर १६ मे या दिवशी निकाल घोषित करण्यात आला. ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी कनिष्ठ कारकुनाच्या नोकर भरतीसंबंधीची सूची मागितली होती आणि या वेळी विद्यापिठाने ५ जणांना नोकरीत घेतल्याचे उत्तरादाखल म्हटले होते. या उत्तरासमवेत देण्यात आलेली माहिती धक्कादायक आहे.

विद्यापिठाने ज्या ५ जणांना सेवेत समावून घेतले आहे, त्यामधील १ जण ५ मे २०२३, ३ जण ११ मे २०२३ या दिवशी, तर उर्वरित १ जण १७ मे २०२३ या दिवशी सेवेत रूजू झाला. म्हणजेच पहिले ४ उमेदवार निकाल लागण्यापूर्वीच, तर शेवटचा उमेदवार निकाल १६ मे या दिवशी लागल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कामावर रूजू झाला. विशेष म्हणजे ही पदे कंत्राटी पद्धतीवर म्हणून घोषित करण्यात आली होती; मात्र पाचही उमेदवारांना सेवेत कायमस्वरूपी घेण्यात आले आहे. गोवा सरकार याविषयी काय कृती करणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.