मुंबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. ४ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी आणि गणेशोत्सव यांनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना वरील आदेश दिला.यामध्ये गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, गणेशोत्सव मंडळांना वीज जोडणी तातडीने देणे इत्यादी दक्षता घ्यावी. राज्यशासनाकडून आतापर्यंत ७५ सहस्र गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहेत. उर्वरित गोविंदांना विमा सुरक्षा कवच देण्याचे निर्देशही या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले.
गणेशोत्सवात ४ रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची अनुमती वाढवली !
रात्री १० वाजेपर्यंत असलेली ध्वनीक्षेपकाच्या मर्यादेची वेळ यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात ४ रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आल्याचे राज्यशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकाची मर्यादा ३ रात्री इतकी वाढवण्यात आली होती.