१९ डिसेंबर वार्ता: ख्रिसमस, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट झालं आहे. यासाठी प्रशासनाने २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मनाईचे आदेश जारी केले आहेत. येत्या काही दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात नाताळ सण तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मनाईचे आदेश जारी केले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं निर्देशनास आलं आहे. यामुळे जिल्ह्यात दक्षतेसाठी मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, प्रतिबंधात्मक काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेसाठी पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर हा आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच या बाबींना लागू होणार नाही.
या आदेशात तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या इत्यादी वस्तू घेऊन फिरण्यावर बंदी असणार आहे. याचबरोबर हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, समाजातील शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे इत्यादी बाबींना बंदी घालण्यात आली आहे.