खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. अमृतपाल सिंग याने त्याची संघटना ‘वारीस पंजाब दे’च्या सदस्यांसह पोलीस ठाण्यावर हल्ला करून फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. वेषांतर करत तो पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर समाजात वितुष्ट पसरवणे, खुनाचा प्रयत्न, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळे निर्माण करणे अशा अनेक फौजदारी खटल्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख आहे. खलिस्तान या वेगळ्या देशाची त्याची मागणी आहे. ‘वारिस पंजाब दे’ ही संघटना पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने तयार केली आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने संघटनेचा ताबा हाती घेतला. त्याने भारतात येऊन लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. अमृतपाल आयएसआयशी जोडल्याचा आऱोप आहे. २३ फेब्रुवारीला अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर त्याने काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकंच नाही तर अमृतपालने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही धमकी दिली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपालने रात्री उशिरा मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी नेपाळच्या सीमारेषेपर्यंत कारवाई केली होती. पण पोलिसांना यश आलं नव्हतं. यादरम्यान अमृतपाल सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ जारी केले होते. यावेळी तो आत्मसमर्पण करणार असल्याच्या चर्चाही सुरु होत्या.