सावंतवाडी प्रतिनिधी:
क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी अटक केलेला आरोपी, लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये याला आज न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली.
याबाबत सविस्तर वृतांत असा की, काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी वनरक्षक इन्सुलि संग्राम पाटील व वनरक्षक कोलगाव सागर भोजने यांनी क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या तीन आरोपींवर सायंकाळच्या दरम्यान झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता एक आरोपी ताब्यात मिळाला व इतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील पकडला गेलेल्या आरोपीचे नाव लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये(वय-३४) असे असून गुन्हेस्थळावरून फरार झालेल्या दोन आरोपींची नावे संदीप रामा गावडे व विश्वास गावडे अशी असून दोघे ही रा.वेत्ये येथील आहेत. आज अटक आरोपी याला सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. शासनाच्या बाजूने तपास अधिकारी तथा वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी आरोपीने गंभीर स्वरूपाचा, अजामीनपात्र गुन्हा केला असल्याने आरोपीला वन कोठडी सुनावण्याची मागणी केली. तर आरोपीच्या वतीने ऍड. नीता गावडे यांनी आरोपीने गुन्हा केलेला नसून तो निर्दोष असल्याने वनकोठडी न देण्याची मागणी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकता, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अटक आरोपीस एक दिवसाची वनकोठडी सुनावली.
सदर कोर्टकेस कार्यवाही ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस.नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक संग्राम पाटील, सागर भोजने, अप्पासो राठोड, वाहन चालक रामदास जंगले यांनी यशस्वीपणे पार पाडली.