रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देणाचा व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षकांना देण्यात येणारा, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, मागील अनेक वर्षे रत्नागिरीतील ग्रामीण भागात अत्यंत निःस्वार्थी भावनेने काम करणारे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. माधव विश्वनाथ अंकलगे यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब, शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकज भोयर साहेब यांच्या शुभहस्ते आणि शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर साहेब, आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार माननीय मनीषाताई कायंदे, प्रधान सचिव माननीय रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त माननीय सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत युवाशक्तीचे प्रमुख अरुण मोर्ये, त्यांचे मोठे भाऊ तथा पदवीधर शिक्षक दिगंबर अंकलगे, माधव वारे, राकेश थुळ व कुटुंबीय उपस्थित होते.
मागील अनेक वर्षे सातत्याने माधव अंकलगे यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता विकास करतानाच पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून व आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने आपल्या नोकरीच्या कारकिर्दीतील दोन्ही शाळा ह्या आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त बनविल्या आहेत. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियान, परसबाग विकसन स्पर्धामध्येदेखील त्यांच्या शाळेने क्रमांक पटकावला आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उठाव करत शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यातून ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असतात. विविध स्पर्धा, वाचन – लेखन उपक्रम, स्पर्धा परीक्षा, आपत्कालीन काळातील सेवा, विविध प्रशिक्षणातील सहभाग, ग्रामीण व शहरी भागातील प्रबोधन, लेखन, संशोधनपर लेखन, विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, विद्यार्थ्यांसोबतच स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, नवभारत साक्षरता अभियानातील सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन, विविध स्पर्धामधील विद्यार्थी सहभाग, त्यांचे यश, स्वतःचे ग्रंथ प्रकाशन, विविध विषयांवरील लेखन या सर्व बाबीचा विचार करून निवड समितीने त्यांची निवड या पुरस्कारासाठी जाहीर केली होती. परसबाग, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, शिक्षण सप्ताह, यासह विविध शैक्षणिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. यासह विविध विषयांवर त्यांनी लेखन करतानाच करिअर मार्गदर्शन, पालक प्रबोधन, विद्यार्थी मार्गदर्शन, विविध अभियाने, प्रशिक्षणे यामध्ये व्याख्याने दिली आहेत.
शैक्षणिक कार्यासोबतच माधव अंकलगे हे विविध क्षेत्रांत लक्षणीय कार्य करत असतात. सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांत त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत, योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाने त्यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मान केला आहे.
जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड समितीने माधव अंकलगे यांच्या कार्याची माहिती घेऊन प्रत्यक्ष शाळेला भेट देत कार्याबद्दलची खातरजमा केली आणि या भेटीदरम्यान त्यांनी शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास पाहून त्याबाबत प्रभावित होऊन निवड समितीने त्यांची निवड केली होती. याकामी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैदही रानडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय सोपनूर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. सविता तोटावार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. माधव विश्वनाथ अंकलगे यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारासाठी त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.







