२३ जुलै वार्ता: राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीने चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाकडून राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस जोरदार बरसत आहे. अशातच हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, ठाणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
