Home स्टोरी कोल्हापूर येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार!

कोल्हापूर येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार!

109

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण! छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहस्रो हिंदूंची एकजूट.

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या निषेधार्थ शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात ७ जून या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपतींच्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच क्रूरकर्मा औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे ‘स्टेटस’ ठेवून छत्रपतींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ वाजल्यापासूनच विविध हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना आणि सामान्य हिंदूही एकत्र येण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ आणि पोलीस यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ६ जूनला रात्री जमावावर आक्रमण झाल्यावर शहरात काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्या प्रकरणी काही हिंदूंना पोलिसांनी रात्री अटक केली. ‘या हिंदूंना तात्काळ सोडण्यात यावे. जोपर्यंत हिंदु कार्यकर्त्यांना सोडत नाहीत’, तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही’, अशी हिंदुत्वनिष्ठांची भूमिका होती. नंतर पोलिसांनी लाठीमार केला. ६ जून या दिवशी झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी १९ जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश घोषित केला. हा आदेश झुगारून सहस्रोंच्या संख्येने हिंदु तरुण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे एकत्र आले.

१. त्यातच पोलिसांनी जमावावर लाठीमार केल्यामुळे महापालिका चौक आणि शिवाजी चौक येथे प्रचंड धावपळ आणि पळापळ झाली. जमाव सैरभर झाल्याने पोलीस आणि राज्य राखीव दलाचे पोलीस यांनी दिसेल त्याला मारण्यास प्रारंभ केल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

२. या वेळी काही पत्रकारांनाही लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची डोकी फुटली आणि ते रक्तबंबाळही झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

३. या वेळी दगडफेकही झाल्याचे समजते. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर काठ्या उगारल्याने जमावाने महापालिका चौकातील रिक्शा फोडली, तसेच काही दुकानेही फोडण्यात आली.

४. मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याने शेकडो चपलांचा खच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पसरला होता.

आंदोलनाच्या प्रसंगी महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया! कायदा मोडणार्‍यांना सोडणार नाही! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहविभागाचे असल्याने मी संबंधित अधिकार्‍यांशी वैयक्तिरित्या बोललो आहे. कुणीही कायदा हातात घेऊन नये. सगळ्यांनी सहकार्य करावे, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी गृहविभाग घेत आहे. स्वत: गृहमंत्र्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातले आहे. कायदा मोडणार्‍यांना सोडणार नाही. *औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री* या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जर औरंगजेबाचे उदात्तीकरण कुणी करत असेल, तर कुणालाही निश्‍चित संताप येईल. आम्ही औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. कोल्हापुरात झालेला प्रकार हा कुणी घडवला ?, हे शोधावे लागेल.

छत्रपती शिवरायांचा अवमान करण्यामागील सूत्रधार शोधणे आवश्यक! – श्री. धनंजय महाडिक, खासदार,

औरंगजेब आणि टीपू सुलतान तुमचे आदर्श असू शकत नाहीत. ‘हे कोण करत आहे आणि याच्या मागे कोण आहे ?’, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍यांना केवळ अटक करून चालणार नाही, तर ‘त्यांचे बोलावते धनी कोण आहेत ?’, याचा शोध घेतला पाहिजे. ‘अवमान प्रकरणी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते कुणाचे आहेत ?’, याचा शोध घेतला पाहिजे.