सावंतवाडी (कोलगाव): कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलमधून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य रोहित भाऊ नाईक, प्रणाली विजय टिकावे, संयोगिता संतोष उगवेकर, आशिया अशोक सावंत यांची भाजप पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी (निलंबन) करण्यात आल्याची माहिती भाजपाचे आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि भाजप पक्षाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी कोलगाव ग्रामपंचायतीचे हे चार ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिले होते. ही पक्ष विरोधी कृती असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे पत्रात नमूद आहे.
खरं तर हे चारही ग्रामपंचायत सदस्य भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे निवडून आले होते. १९९५ मध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत शिवसेनेकडे आणण्याचे काम महेश सारंग यांच्या मातोश्री कै. वृद्धा सारंग यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. १९९५ पासून २५ वर्षे ही ग्रामपंचायत महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली राहिली आहे. त्यामुळे महेश सारंग विरोधात पत्रकार परिषद घेताना, संजू परब यांना पाठिंबा देताना या चारही ग्रामपंचायत सदस्यांनी विचार केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. असे संतोष राऊळ यांनी स्पष्ट केलं आहे.







