कोरोना विषाणूचा प्रभाव आता देशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला होता. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. या अनुषंगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन, मास्क लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये घेणार आहेत. यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी असतील. देशभरातल्या परिस्थितीचा रुग्णसंख्येचा पंतप्रधान मोदी आज आढावा घेतील. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे १,१३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ७,०२६ वर पोहोचली आहे. तर ६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर सध्या ९८.७९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत कोरोना प्रतिबंधक लसीच्या ७,६७३ मात्रा देण्यात आल्या. तर देशात आत्तापर्यंत २२० कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आहेत.