Home स्टोरी कोमसाप सावंतवाडी शाखेच्या १९ जुलै रोजी ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रमाचे आयोजन!

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या १९ जुलै रोजी ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रमाचे आयोजन!

147

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्याची मिरगवणी हा उपक्रम यंदा माजगाव प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. साहित्याची मिरगवणी हा उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा गेल्या वर्षीपासून राबवत आहे. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील मिरगवणी ही पावसाळा सुरू होण्याचा शुभारंभ मानला जातो, मात्र यंदा पाऊस जूनच्या मिरगवणी ला अनुभवता आला नाही. मात्र उशिरा पाऊस सुरू झाल्याने यंदा साहित्याची मिरवणी १९ जुलैला माजगाव येथे होणार आहे. या मिरगावणी साहित्याची उपक्रमामध्ये साहित्यिक आणि शेती उपक्रम आणि त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, एकांकिका, मालवणी बोली भाषेत ओव्या, गीत या माध्यमातून साहित्याची पावसाळी मिरगवणीचा अनुभव घेता येणार आहे.

गतवर्षी साहित्याची मिरगवणी ७ जून निरवडे येथे घेण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यंदाच्या दुसऱ्या वर्षी माजगाव येथे साहित्याची मिरगवणी हा उपक्रम घेतला जाणार आहे. साहित्य चळवळ आणि मराठी भाषा व मालवणी बोली भाषा टिकावी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोलीभाषेतील गीत, ओव्या या लोप होत चालले आहेत. त्या पुन्हा गुणगुणता याव्यात आणि त्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्याची मीरगवणी हा जिल्हास्तरीय उपक्रम राबवण्यात येत आहे.

या उपक्रमा संदर्भात कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची बैठक झाली. या बैठकीत तालुका अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी कोकणातील पाऊस आणि भात शेती लागवड हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे आणि त्याच धर्तीवर साहित्याची मिरवणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी स्वतः लिखित कविता, कथा, लेखन, ओव्या सादर करू शकता. तरी या उपक्रमात ज्याना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे रविवार १६ जुलै पर्यंत सादर करावीत असे स्पष्ट केले.

यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर, विनायक गावस, प्रज्ञा मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत, सरपंच सौ अर्चना सावंत, ग्रामपंचायत सदस्य आधी उपस्थित होते. हा उपक्रम आगळावेगळा असून १९ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत साहित्याची मिरगवणी कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात माजगावतील शाळेतील मुले, पालक व साहित्य प्रेमी सहभाग घेणार आहेत. तरी अजून कुणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे सचिव प्रतिभा चव्हाण व माजगाव ग्रामपंचायत येथे द्यावीत. असे आवाहन तालुका अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत आणि सरपंच सौ. डॉ. अर्चना सावंत यांनी केले आहे.