मालवण: कोकण लाईव्ह हे चॅनेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यातून बऱ्यापैकी प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहे. अनेक लोकांपर्यंत हे माध्यम पोहोचते. कोकण लाईव्हचे संपादक सिताराम गावडे यांनी आपल्या संपादकीयमधून मालवणच्या पर्यटन क्षेत्राच्या नेमक्या सच्चाई बाबत अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केले. मालवणची आर्थिक घडी आज पर्यटनावर विसंबून आहे, त्यामुळे “समुद्रातील बोटिंगच्या आड मालवणात अंमली रॅकेट ” अशा प्रकारच्या संपादकीयावर तीव्र प्रतिक्रिया उमटणे अपेक्षितच होते. त्यानुसार मालवणमधील काही पर्यटक व्यावसायिकांनी एकत्र येत त्या विरोधात भूमिका घेतली. संबंधित पत्रकाराने मालवणात येऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा पोलीस तक्रार करणार असल्याचे या पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केले आहे.
दुसरीकडे कोकण लाईव्हचे सिताराम गावडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या विरोधात लढत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोकण लाईव्हने आपल्या संपादकीयात व्यक्त केलेले मुद्दे गंभीर आहेत. पुरावे देणे न देणे, हा कायद्याचा भाग झाला, परंतु या धुरामागे काही आग आहे का याची शहानिशा करून त्याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनावर आली आहे. पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी यापूर्वीच जिल्ह्याला व्यसनाधीन करणाऱ्या सगळ्याच गोष्टी विरोधात कडक भूमिका घेतली आहे. असे धंदे करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, कोणीही असो त्याचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही, ही त्यांची भूमिका असल्याने आता या विषयात त्यांच्याकडे जनतेचे लक्ष नक्कीच राहणार आहे. कणकवलीतील मटका अड्ड्यावरील दुर्लक्षामुळे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित झाल्याने त्यांच्या वचकाची व भूमिकेची धास्ती पोलीस प्रशासनाला नक्कीच असणार. आपल्या संपादकीयात कोकण लाईव्हने पोलीस, कोस्टगार्ड, महसूल या तिन्ही यंत्रणांना आरोपीच्या कठड्यात उभे केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात जे काय वास्तव असेल ते उघड होते की, मांडलेले वास्तव ही कुठेतरी थोडीफार तरी सच्चाई असेल तर या यंत्रणांकडून पत्रकार सिताराम गावडे यांच्यावर दबाव आणला जाईल? प्रशासनविरुद्ध पत्रकारिता यांची या मुद्द्यावरील लढाई किती टिकेल? लढताना पत्रकार सिताराम गावडे यांना रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची वेळ येईल असे का वाटू लागले आहे? खूप सारे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे जनतेला मिळणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन, जिल्ह्याचे नाव हे महत्त्वाचे आहेच, त्याची बदनामी होता नये… पण… पत्रकारितेच्या माध्यमातून येत असलेल्या या धुरामागे सरसकट नसेल, मात्र कुठेतरी थोडीफार तरी खरोखरच आग असेल तर?
केवळ पर्यटन आणि नाव टिकावे यासाठी भावी पिढीचे भवितव्यही धोक्यात येता नये. कारण अमली पदार्थांचा वेढा आणि त्या मागची परकीय शक्ती खूप ताकदवान आहे, हे आपण सारेच जाणतो. ही शक्ती रुजत गेली तर त्या पैशातून पुढे बीडसारखी कोणालाही भर रस्त्यात नाहीसे करण्याची माजोरी येते हे शांत सुसंस्कृत महाराष्ट्राने अनुभवले आहे. म्हणून सगळ्याच माहितीचे स्त्रोत कठोरपणे तपासले पाहिजेत आणि आरोपांची शहानिशा होऊन जे मळभ असेल ते दुर झाले पाहिजे.
तूर्तास या विषयात दूध का दूध पानी का पानी होऊनच जावे या अपेक्षेसह कोकण लाईव्हच्या संपादकीय मधून पत्रकार सिताराम गावडे यांनी उपलब्ध केलेले मुद्दे इथे अधोरेखित करतो आहे. त्यांनी म्हंटल्याप्रमाणे आर्थिक व्यवहारांचे स्त्रोत, जनतेकडून मिळालेली माहिती आणि अन्य स्रोत तपासण्याची जबाबदारी आता प्रशासकीय आहे आणि प्रशासकीय तपासाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक कोकणी माणसाची! एकूणच कोकणच्या पर्यटनावर उठलेले गंभीर प्रश्नचिन्ह कोकणी संस्कृतीच्या अस्तित्वावर तर आडवे येणार नाही ना हा त्याहून गंभीर प्रश्न आहे. जर त्यात काही सत्य नसेल, तर तेही प्रामाणिकपणे जनतेसमोर आले पाहिजे. आणि थोडेफार जरी सत्य असेल, तर….
रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याची पाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी किमान कोणावर येऊ नये! कोकण लाईव्हच्या “त्या” संपादकीय मधील मुद्दे, ज्यावरून मालवणमधील वातावरण तापल्याचा दावा केला जातोय, ते असे आहेत.
🔲 मालवण, तारकर्ली, चिवला, दांडी, रॉक गार्डन या मालवणमधील प्रसिद्ध पर्यटन स्पॉट असणाऱ्या किनाऱ्यांवर पर्यटकांचा महापूर ओसंडतो. पण याच पर्यटनाच्या आड काहीतरी संशयास्पद आणि धोकादायक घडते आहे.
🔲 बोटींगसाठी येणाऱ्या गाड्यांमधून केवळ पर्यटकच येत नाहीत , की त्याच बरोबर आणखी काही घातक मालही वाहतूक होतोय.
🔲 कतार व सौदीहून पैशांचा प्रवाह काही व्यक्तींच्या खात्यांवर येतो. त्यातून बोटींचा व्यवहार चालतो, तर संबंधितांना १० टक्के कमिशन दिले जाते. हा पैसा केवळ पर्यटन व्यवसायासाठी आहे की अंमली पदार्थ रॅकेटला चालना देण्यासाठी, हा मूलभूत प्रश्न आहे.
🔲 “म्याऊ” या गुप्त नावाखाली गांजा व इतर पदार्थांचा व्यापार होतो आहे.
🔲 एकेकाळी सामान्य घरातील काही लोक आज अचानक कोट्यवधींची भाषा करतात. कुणी बोट मालक, कुणी पक्षात सक्रिय, तर कुणी गोव्यात मसाज पार्लर उघडून पैसे फिरवतोय.
🔲 पर्यटनाच्या नावाखाली जर सिंधुदुर्ग किनारा अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकला, तर स्थानिक तरुणाईचा नाश होईल.
🔲 सरकार “ड्रग्स फ्री महाराष्ट्र”च्या घोषणा देते, पण मालवण किनाऱ्यावर रात्रीच्या हालचालींवर नियंत्रण नाही. पोलिस, कोस्ट गार्ड, महसूल विभाग या तिन्ही यंत्रणा डोळेझाक करतात.
🔲 मच्छीमारांना या हालचाली दिसतात, स्थानिकांना हे प्रश्न जाणवतात, फक्त प्रशासनाच्या नजरेत त्या येत नाहीत
🔲 कुणीतरी प्रभावी व्यक्तींचे संरक्षण या रॅकेटला मिळते आहे
🔲 “पर्यटन विकासा”च्या नावाखाली सिंधुदुर्ग किनारपट्टीचा वापर अंमली पदार्थांच्या व्यवहारासाठी होतोय.
🔲 मालवणात ज्या गाड्या येतात त्या गाड्यांतून खरेच पर्यटक येतात की भविष्यातील व्यसनाधीनतेचा बीजोत्सव चालला आहे?
एकूणच विषय तर गंभीर! पाहायचे, कोण किती खंबीर!!
अविनाश गंगाधर पराडकर
9422957575







