सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकण रेल्वे मागांवरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल, अशी खात्रीशीर माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाणे ६०५, पनवेल ६४० खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास आता कोकण रेल्वे मार्गावर अखेर आता सुरू होणार आहे.
ही आठ डब्यांची गाडी उद्घाटनासाठी मडगाव येथे नुकतीच दाखल झाली. आयसीएफ चेन्नई येथून निघालेली ही गाडी शनिवारी सायंकाळी येथे पोहोचली होती. या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावकडे जाताना कणकवली येथे ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. रायगड जिल्ह्यात रोहा व पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री ८ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पनवेल येथे ९ वाजून १८ मिनिटांनी पोहोचेल.