सावंतवाडी: कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदभरतीच्या अर्ज प्रक्रियेला दि.१६ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. १९० पदांचा समावेश असून दि.६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. कोकण रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ज्ञ, सहाय्यक लोकोपायलट, स्थानकप्रमुख, मालवाहतूक व्यवस्थापक, कमर्शियल पर्यवेक्षक, ट्रॅक व्यवस्थापक व पॉईंट मॅन या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी केवळ गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील मूळ रहिवाशीच अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांची रेल्वेसाठी जमीन संपादित झाली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोकण रेल्वेत कर्मचारी आहेत, ते देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता वेळेआधी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या पदांवरील निवडीसाठी उमेदवाराला प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त पदांनुसार चाचणी घेवून कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. काही पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीही द्यावी लागणार आहे. पहिला टप्पा पार केल्यानंतरच उमेदवार पुढच्या टप्प्यात जातील व सर्व टप्पे पार केल्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे.