Home स्टोरी कोकण मराठी साहित्य परिषदेला नवीमुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ...

कोकण मराठी साहित्य परिषदेला नवीमुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

80

प्रतिनिधी ౹ मुंबई दि. ३ – कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, सुप्रसिद्ध साहित्यिक मधू मंगेश कर्णिक व कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन एक निवेदन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिल आश्वासन दिले.

कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठी भाषा व साहित्य यांची गेली ६५ वर्षे केलेल्या सेवेतुन माझ्या निरीक्षणानुसार, मराठी भाषा व साहित्य यांच्या भल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आपण मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी. यात मराठी भाषा विभागाचे कार्य, कर्नाटक सीमा भागासाठी ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ सुरु करणे, ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेमध्ये मालगुंड येथील केशवसुत स्मारकाचा समावेश करणे, केशवसुत स्मारकाच्या मालगुंड या गावाला पर्यटनाचा दर्जा देणे, मुंबईत घसरता मराठी टक्का, मुंबई विद्यापीठात ‘केशवसुत अध्यासन’ सुरु करणे, मराठी भाषा धोरण, मराठीसाठी प्राधिकरण, मराठी विद्यापीठाची स्थापना, प्रादेशिक साहित्य संस्थांना साहित्य संमेलनासाठी निधी आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हावी.

संस्थापक मधु मंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ यांच्या शिष्टाईला यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मधू मंगेश कर्णिक यांच्या या मुद्द्यांवर मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकारी यांची तात्काळ बैठक बोलविण्याचे आदेश दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी कोमसापला नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्याचेही आदेश दिले. कोकण मराठी साहित्य परिषदच्या अंतर्गत ‘मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ’ या बॅनरखाली महाराष्ट्रातील २४ संस्थांनी एकत्र येत, मराठी भाषा, संस्कृती व साहित्य यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या हेतु बाळगला आहे. या संस्थांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल घेत, मुंबईत ‘मराठी भाषा भवना’च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनही मधु मंगेश कर्णिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्यावेळी केले. मागील अनेक दिवस कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी प्रयत्नशील असताना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीची वेळ देत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कोकण मराठी साहित्य परिषदेने समाधान व्यक्त केले. या भेटीप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्री श्री. शंभूराजे देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, आमदार नितेश राणे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले उपस्थित होते.