सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणच्या लाल मातीतील कोहिनूर हिरा ज्याने मालवणी भाषेला मानसन्मान मिळवून दिला एवढेच नव्हे तर मालवणी भाषेला सातासमुद्राच्या पार पोचवले त्या वस्त्रहरणकार ज्येष्ठ लेखक नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असून कै.गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोमसाप सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शोकसभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व शाखेच्या पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विविध साहित्यिक संस्थांच्या सदस्यांनी, साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोमसाप अध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी २२ मार्च २०२५ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित जिल्हास्तर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कै.गंगाराम गवाणकर तथा नाना उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी संमेलनाच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी येथे येत मोठ्या उत्साहाने संपूर्ण दिवस संमेलनाचा आनंद लुटला होता आणि मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरणचे अनेक किस्से सांगून साहित्य प्रेमींना पोट धरून हसवले होते. नानांच्या अशा अनेक आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या करण्यासाठी शुक्रवारी कुडाळ येथे होणाऱ्या शोकसभेत साहित्य प्रेमींनी जरूर उपस्थित रहावे. यावेळी ज्यांना शोकसभेत २ मिनिटात आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्यांनी आपली नावे कोमसापच्या प्रत्येक तालुक्याच्या शाखेचे अध्यक्ष किंवा जिल्हा सचिव संतोष सावंत यांच्याकडे द्यावीत असे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी सूचित केले आहे.







