३ डिसेंबर वार्ता: रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे राहणाऱ्या रिना नायर या महिलेने आर्थिक अडचणीमुळे मुली जिया नायर (१४) व लक्ष्मी नायर अशा दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेस या रेल्वेखाली पहाटे ३ वाजता आत्महत्या केल्याची घटना घडली.
मृत्यूपूर्वी महिलेने ‘वहिनी, मला माफ करा. मी तुम्हाला बोलले, पण माझ्याकडून होत नाही. मी दोन मुलींना घेऊन रेल्वेखाली आत्महत्या करायला जात आहे’ असा आत्महत्येपूर्वी आपल्या वहिनीला मेसेज केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रिना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून एक मुलगी होती, तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा २ मुली रिना यांना होत्या. दुसरे लग्न केरळ येथील जगमोहन नायर यांच्याशी झाले होते. रिनाने प्रेमविवाह केला होता, पण पती दुसरीकडे राहत होता. दोन्ही मुलींचा शाळेची फी, क्लासची फी, खोलीचे भाडे, दैनंदिन व्यवहारातील खर्च हे सगळे खर्च भागवणे रिनाला कठीण झाले होते. इतकेच नव्हे तर यामुळे मोबाइलचे हप्तेदेखील धकले होते. खोलीचे भाडेदेखील त्या देऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अखेर मेसेज करून आपली दोन मुलींसह जीवनयात्रा संपवली. रिनाच्या मैत्रिणीला मेसेज कळताच तिने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.