सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच रामगड नावाचा किल्ला आहे. आता दापोली तालुक्यात रामगड नावाचा किल्ला आढळल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा आहे. दापोली तालुक्यातील दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिमेवर रामगड नावाच्या किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासकांनी घेतला आहे. दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे पुरात्व अभ्यासक सचिन जोशी यांनी रामगड किल्ल्याचा शोध लावला आहे. या नव्याने आढळलेल्या रामगड किल्ल्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. तसेच वास्तुरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित रामगड हा अपरिचित दुर्ग असल्याचंही दुर्ग अभ्यासकाचं म्हणणं आहे. दापोली तालुक्यातील पालगड या गावाच्या पूर्वेला दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर हा किल्ला आढळला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३९० मीटर उंचीवर रामगड हा एक अपरिचित असा छोटेखानी किल्ला सापडला आहे. दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डॉ. सचिन जोशी यांनी अथक प्रयत्नांनी हा अप्रसिद्ध रामगड किल्ला शोधून काढला आहे. रामगड किल्ला सापडल्यामुळे ऐतिहासिक ठेव्याचा एक नवा वारसा प्रसिद्धीस आला आहे.
रामगड हा नव्याने सापडलेला किल्ला हा पालगड किल्ल्याचा जोडकिल्ला आहे. यामुळे किल्ल्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला रामगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यात आहे, तर दुसरा रामगड किल्ला रत्नागिरी जिह्यातील खेड तालुक्यात आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याची माहिती सध्या उपलब्ध नाही, दुर्ग अभ्यासकांकडून याबाबत अधिक शोध सुरु आहे. मात्र पालगड किल्ल्याबरोबरच हा रामगड किल्लादेखील बांधला गेला असावा, अशी माहिती दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी दिली आहे.