Home शिक्षण कोकणच्या नैसर्गिक गुणवत्तेला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध – प्रा. राजाराम परब.

कोकणच्या नैसर्गिक गुणवत्तेला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध – प्रा. राजाराम परब.

155

मळगाव प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

 

सावंतवाडी: दहावी आणि बारावी परीक्षेत सातत्याने संपूर्ण राज्यात डंका बजावणाऱ्या आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई, तसेच एमएचटी – सीईटी यांसोबतच एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश संपादन करण्यासाठी आता परफेक्ट अकॅडेमीने कंबर कसली असून सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडेमीसोबत आता संपूर्ण स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाणार आहे. आगामी काळात आपल्या कोकणातील युवा वर्गाचे टॅलेंट राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी परफेक्ट अकॅडेमी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब यांनी मळगाव येथे व्यक्त केले.

मळगाव न्यू इंग्लिश स्कूल मळगाव येथील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘दहावीनंतर आपले करिअर कसे करावे.?’ याबाबत प्रा. राजाराम परब यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील, सहाय्यक शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर, महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर तसेच परफेक्ट अकॅडेमीचे आशिष सावंत, शीतल कांबळी, परिमल धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. राजाराम परब यांनी पुढे सांगितले की, मुळातच कोकणातील विद्यार्थी हा नैसर्गिकरित्या कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी आहे. मात्र मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविता आले नाही. त्यासाठीच आता परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्सच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात सलग पंधरा दिवस मोफत मार्गदर्शन वर्ग कुडाळ व सावंतवाडी येथे आयोजित केले असून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी दहावीनंतर व बारावीनंतर आगामी काळात कोणते कोर्सेस करावेत?, जेणेकरून आपल्याला सहज नोकरी व इतर व्यवसायात यशस्वी होता येईल, याबाबत माहिती दिली.

 

दरम्यान आतापर्यंत परफेक्ट अकॅडेमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे गमकही प्रा. राजाराम परब यांनी विस्तृतपणे सांगितले.

या कार्यक्रमात महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच विविध कोर्सेसची माहिती उपलब्ध नसल्यामुळे आपल्या कोकणातील विद्यार्थी मागे पडत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी तसेच टीम परफेक्ट अकॅडेमीने विशेष प्रयत्न केले.