दोडामार्ग प्रतिनिधी: केर, मोर्ले परिसरात दाखल झालेल्या हत्तींना जंगलात हाकलवण्यासाठी पश्चिम बंगाल येथून हाकारी पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे. शिवाय वनविभागाने ग्रामस्थांच्या मागण्यांवर समाधान कारकउत्तरे दिल्याने तेथील ग्रामस्थांनी २५ मे पासून पुकारलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्याची माहिती केर उपसरपंच तेजस देसाई व मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दिली आहे.
केर, मोर्ले गावात हत्ती प्रश्न जटील झाला असून प्रत्येक ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. हत्ती हटाव बाबत शासनाला वेळोवेळी सांगूनही ठोस उपाय योजना न झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्यांबाबत येथील वनविभागाला निवेदन दिले.
यात घोटगेवाडी, मोर्ले, केर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने लोखंडी जाळी आवरण बसवून रस्ता सुरक्षित करावा. दिवस रात्र वनविभागाचे कर्मचारी तैनात करावे. ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने भ्रमणध्वनी क्रमांक संबधित ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लावावेत. नुकसानीचे पंचनामे फोनवरून करण्याची प्रक्रिया स्विकारून संबंधित अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी शेतकऱ्यास मिळावा. केर गावातील हत्तीचे वास्तव्य, झालेले नुकसान व केलेल्या उपाययोजना याचा सविस्तर तपशील मिळावा. ग्रामस्थांना येत असलेले भितीदायक अनुभव व होत असलेले नुकसान याचा लेखी तपशील ग्रामस्थांसोबत बैठक घेवून वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात यावा. शेतकरी शेती करत नसल्याने प्रति कुटुंब अनुदान जाहीर करावे. हत्ती पकड मोहीम राबवून कर्नाटकच्या अधिवासामध्ये सोडावे. या मागण्या निवेदनाद्वारे देत त्या पूर्ण कराव्यात. अन्यथा २५ मेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला होता. याची वनविभागाने दखल घेत ग्रामस्थांची भेट घेतली.
यावेळी दोन्ही गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. वनक्षेत्रपाल अरुप कन्नमवार यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल पाठविला जाईल व त्याची प्रत ग्रामस्थांना सोमवारी देऊ असे वनक्षेत्रपाल कन्नमवार यांनी सांगितले.