Home स्टोरी केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना सोशल मीडिया वापराबाबत नवे निर्देश जारी!

केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना सोशल मीडिया वापराबाबत नवे निर्देश जारी!

119

२६ ऑगस्ट वार्ता: केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना वाढत्या हनी-ट्रॅपिंग आणि हॅकिंगच्या घटनांमुळे सोशल मीडिया वापराबाबत नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या जवानांनी गणवेशात व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्राच्या गुप्तचर विभागाने विविध प्रकारची निमलष्करी दले आणि पोलीस दलातील जवानांना यासंबंधी नोटीस दिली आहे. या नियमांची तातडीने आणि गांभीर्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश सीआरपीएफने आपल्या जवानांना दिले आहेत. तसेच, हे नियम फॉलो न करणाऱ्या जवानांवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही यात म्हटलं आहे.

युनिफॉर्ममध्ये बनवलेल्या रील्ससोबतच, प्रतिबंधित भागातील व्हिडिओ शेअर करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सोबतच, सीमा भागातील व्हिडिओ, प्रतिबंधित भागातील व्हिडिओ किंवा सीमेवर तैनात जवानांचे व्हिडिओ पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस कमिश्नर संजय अरोरा यांनीदेखील एका स्वतंत्र नोटीसद्वारे जवानांना आणि पोलिसांना निर्देश दिले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीबाबत, अंडर ट्रायल व्यक्तीबाबत किंवा संवेदनशील विषयांबाबत पोस्ट किंवा कमेंट करणे टाळावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.